माझे शहर…माझी जबाबदारी ! एकाचवेळी चार हजार हात स्वच्छतेसाठी सरसावणार !
schedule24 Feb 26 person by visibility 58 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याची जबाबदारी आपल्या साऱ्यांची आहे. त्या अनुषंगाने माझे शहर…माझी जबाबदारी या संकल्पनेतंर्गत २७ फेब्रुवारी २०२६ रोजी कोल्हापूर शहरात एकाचवेळी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. महापालिका कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी मिळून दोन हजार जणांचा यामध्ये सहभाग असणार आहे.’अशी माहिती महापौर रुपाराणी निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘सकाळी सात वाजल्यापासून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहिम सुरू होईल. माझी जबाबदारी या संकल्पनेतंर्गत दोन हजार जणांचे मिळून चार हजार हात स्वच्छतेसाठी सरसावणार आहेत. पहिल्यांदा शहरातील सगळे फूटपाथ स्वच्छ केले जातील. त्यावरील अतिक्रमण हटविले जातील. सगळे रस्ते स्वच्छ केले जातील. दुसऱ्या टप्प्यात शहरातील अंतर्गत रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत.’असे महापौरांनी सांगितले.
महापालिकेशी निगडीत विविध विषयांना चालना देण्यासाठी २४ फेब्रुवारीपासून रोज एका विभागाची आढावा बैठक होणार आहे. अतिक्रमण विभाग, केएमटी, विद्युत विभाग, स्वच्छता विभाग व पाणी पुरवठा विभागाची बैठक होणार आहे. पाच मार्च रोजी जनता दरबार आयोजित केल आहे. यामध्ये नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असे निकम म्हणाल्या. पत्रकार परिषदेवेळी उपमहापौर अक्षय जरग, सभागृह नेते मुरलीधर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास आदी उपस्थित होते.