शिक्षण हक्क आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ ताकतीने उतरणार
schedule23 Feb 26 person by visibility 55 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाला विरोध करण्यासाठी कोल्हापुरात २६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शिक्षण हक्क यात्रा व शिक्षण हक्क परिषद आयोजित केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ ताकतीने सहभागी होणार आहे. शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय झाला. शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार जयंत आसगावकर यांनी बैठकीला मार्गदर्शन केले.
सरकारच्या पंधरा मार्च २०२४ च्या संच मान्यतेच्या आदेशामुळे, शेकडो वर्ग शिक्षकाविना राहणार आहेत. त्यामुळे वाडी वस्तीवरील सर्वसामान्य, गोरगरीब बहुजनांचे शिक्षण बंद होणार. त्यासाठी शाळा वाचवा- शिक्षण वाचवा अभियानामार्फत शिक्षण हक्कयात्रा व शिक्षण हक्क परिषद आयोजित केलेली आहे. या शिक्षण हक्क यात्रेत व परिषदेत कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघांने ताकतीने सहभागी होण्याचा निर्णय मुख्याध्यापक संघ येथे झालेल्या बैठकीत झाला. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील ,विजय देवणे ,संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष शारंगधर देशमुख, शिक्षक नेते दादा लाड, प्रसाद पाटील, प्रभाकर हेरवाडे, सुधाकर सावंत,उमेश देसाई ,राजेश वरक, राजेंद्र कोरे, उदय पाटील, सुधाकर निर्मळे , मनोहर जाधव, शिवाजी भोसले, इरफान अन्सारी, रवींद्र मोरे ,रियाज शिकलगार ,विजय सुतार, संदीप पात्रे ,सूर्यकांत बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली.
चंदगडमधून निघणार शिक्षण हक्क यात्रा
शिक्षण हक्क यात्रा 26 फेब्रुवारी रोजी चंदगड येथून सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सुरू होणार. तेथून तहसीलदार कचेरीपर्यंत रॅली निघून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. ही यात्रा आजरा मार्गे भुदरगड येथे मुक्कामास येणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी भुदरगड येथून राधानगरी येथे जाणार त्यानंतर यात्रेचा मुक्काम कोल्हापूर येथे होणार आहे. २८ तारखेला सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ही यात्रा छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ या ठिकाणी दाखल होईल. या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण हक्क परिषदेत होणार आहे.