जिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मुख्याध्यापक शिक्षण- क्रीडा समितीवर सदस्य
schedule11 Nov 26 person by visibility 35 categoryजिल्हा परिषद
राजमोहन पाटील, जी. एस. पाटील, अर्जुन पाटील यांची शिक्षण समितीवर निवड
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदमधील शिक्षण व क्रीडा समितीवर शिक्षक संघटनेचे दोन प्रतिनिधी व एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून जिल्ह्यातील तीन मुख्याध्यापकांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाचे जिल्हा सल्लागार व विद्यामंदिर बेनिक्रे येथील मुख्याध्यापक गणपती शंकर तथा जी. एस पाटील व प्राथमिक शिक्षक समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष व विद्यामंदिर चोकाक येथील मुख्याध्यापक मुख्याध्यापक अर्जुन दिनकर पाटील यांची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड झाली. केंद्रीय प्राथमिक शाळा शेडशाळ येथील मुख्याध्यापक राजमोहन जगन्नाथ पाटील यांची शिक्षक तज्ज्ञ म्हणून समिती सभेसाठी निवड झाली आहे. पाटील हे प्राथमिक शिक्षक संघाचे (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) राज्य संपर्क प्रमुख आहेत. या तीनही मुख्याध्यापकांना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या सहीनिशी निवडीचे पत्र मिळाले आहे.
शिक्षण समितीवर निवड झालेले तिघेही गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिक्षक म्हणून सेवेत आहेत. तसेच शिक्षक संघटनेच्या पातळीवर कार्यरत आहेत. तसेच शिक्षक बँकेत संचालक, अध्यक्ष म्हणून काम केले आहे. शाळा, शिक्षक संघटना आणि शिक्षकांच्या संस्था अशा तीन ठिकाणी त्यांनी काम केले आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण अधिक गतीमान करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शाळांचा दर्जा उंचावणे, शिक्षणात नवनवीन प्रयोग राबविण्यासह विविध शैक्षणिक उपक्रमासाठी जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समिती कार्यरत आहेत. या समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून एकाचवेळी तीन मुख्याध्यापकांची निवड झाली आहे.
राजमोहन पाटील हे केंद्रीय प्राथमिक शाळा शेडशाळ येथे मुख्याध्यापक आहेत. गेली ३४ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक संघाचे पदाधिकारी म्हणून काम केले आहे. मुख्याध्यापक जी.एस. पाटील यांची ३७ वर्षे सेवा झाली आहे. शिक्षकांच्या विविध संस्थेशी निगडीत आहेत. कागल तालुका प्राथमिक पतसंस्थेचे चेअरमन म्हणून काम केले आहे. मुख्याध्यापक अर्जुन पाटील यांची ३७ वर्षे नोकरी झाली आहे. शिक्षक म्हणून काम करतानाच हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचेही ते चेअरमन आहेत.