जाजम-घडयाळ खरेदीत घोटाळा, गोकुळकडून बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी- शिवसेना उपनेते संजय पवार
schedule08 Sep 25 person by visibility 86 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे प्राथमिक दूध संस्थांना दिलेल्या जाजम व घडयाळ खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. मुळात ही खरेदी निविदा प्रक्रिया न राबविता कोटेशन पद्धतीने केली. शिवाय बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी झाली आहे. तीन कोटी ७४ लाख रुपयांच्या खरेदीत बाजारभावानुसार एक कोटी ८४ लाख रुपयांची तफावत दिसते असा आरोप शिवसेना उपनेते संजय पवार यांनी केला. बाजारभावानुसार जाजम व घडयाळाची किंमत साधारणपणे ३२२८ रुपये किंमत असताना गोकुळकडून डबल दराने खरेदी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले, सत्तेचा दुरुपयोग करून निविदा न काढता कोटेशन पद्धतीने कोट्यावधी रुपयांची खरेदी करणे हे बेकायदेशीरच आहे.दूध संस्थांना भेटवस्तू देण्यास आमचा कधीही विरोध नव्हता परंतु ज्या पद्धतीने जाजम व घड्याळाची खरेदी झाली आहे त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला आहे. दूध उत्पादक शेतकरी यांच्या कष्टाचे व घामाच्या पैशांचा दुरुपयोग होऊन कोणीतरी डल्ला मारणे हे योग्य नाही. सध्या या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कष्टकरी शेतकरी व गोकुळ दूध यांचे नाते डोळ्यासमोर ठेवून पारदर्शकपणे चौकशी करावी. या साऱ्या प्रकाराला कार्यकारी संचालक व संचालक मंडळ जबाबदार दिसतात. संबंधितांकडून पैसे वसूल वसूल करावेत.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘महायुती सरकारने या साऱ्या प्रकरणाची त्रिसदस्यी समिती नेमून चौकशी करावी. या खरेदीला संचालक मंडळाने संमंती कशी दिली ? संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमावा. शिवाय गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी यासंबंधी भूमिका स्पष्ट करावी अशी आमची मागणी आहे. ’पत्रकार परिषदेला अवधूत साळोखे, स्मिता मांडरे, मंजित माने आदी उपस्थित होते.