पोटनियम दुरुस्तीला मंजुरी, गोकुळचे संचालक २५ होणार ! संघातर्फे आईस्क्रीम-बासुंदीचे उत्पादन, वासाच्या दूध खरेदीदरात दुप्पट वाढ!!
schedule09 Sep 25 person by visibility 141 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक संख्या २५ करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळ दूध संघाची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (९ सप्टेंबर २०२५) झाली. दरम्यान गोकुळच्या संचालक संख्या वाढीच्या ठरावाला संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोध केला. महाडिकांचा विरोध नोंदवून घेत संचालक वाढीचा निर्णय बहुमताने झाल्याचे चेअरमन मुश्रीफ यांनी सांगितले. दरम्यान कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. या वाचनावेळी मुश्रीफ व पाटील समर्थक आणि महाडिक समर्थकांत झालेली घोषणाबाजी वगळता सभा सुरळीत झाली.
कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे झालेल्या या सभेत बोलताना चेअरमन मुश्रीफ यांनी, २०२१ ते आजअखेर गोकुळ दूध संघाने म्हैस दूध खरेदी दरात तेरा रुपये तर गाय दूध खरेदी दरात सात रुपयांनी वाढ केली आहे असे सांगताच सभासदांनी टाळया वाजवून अभिनंदन केले. या सभेत वासाच्या दूध खरेदी दरात दुप्पट वाढ केल्याची घोषणा झाली. गाय दूध खरेदी दर पूर्वी चार तर म्हैस दूध खरेदी दर सहा रुपये होता. वासाचे हे दूध अनुक्रमे आठ व बारा रुपये दराने खरेदी केले जाणार असल्याचे चेअरमनांनी सांगितले. गोकुळमधील सत्ताधारी संचालक मंडळाचे नेते वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची सभेला प्रमुख उपस्थिती होती.
महायुतीचा अध्यक्ष झाल्यामुळे यंदा, सभेत कोणताही गोंधळ होणार नाही, घोषणा दिल्या जाणार नाहीत. सभेला पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही संचालिका महाडिक यांनी सभेच्या पूर्वसंध्येला दिली होती. त्यानुसार मंगळवारी झालेली सभा दोन तास चालली. शिवाय गेली चार वर्षे वार्षिक सभेदिवशी दिसणारे घोषणा, वादावादी हे चित्र यंदा नव्हते. संचालिका महाडिक यांनी संचालकासोबत व्यासपीठावर आसनस्थ व्हावे म्हणून त्यांच्यासाठी खुर्ची ठेवली होती. मात्र महाडिक यांनी व्यासपीठावर न जाता, दूध उत्पादकांसोबत बसणे पसंत केले.
चेअरमन मुश्रीफ यांनी पाऊण तासाच्या भाषणात गोकुळ दूध संघाची चौफेर प्रगती होत असल्याचे प्रारंभीच नमूद केले. ‘ संघाच्या ठेवी व उत्पन्नात वाढ झाली आहे. मार्च २०२५ अखेर गोकुळची उलाढाल ३ हजार ९६६ कोटीपर्यंत वाढली. गतवर्षीच्या तुलनेत २९६ कोटी रुपयांची वाढ आहे. आर्थिक वर्षात गोकुळला ११ कोटी ९७ लाख ७४ हजार ५७३ रुपये इतका नफा झाला आहे.’असे सभेच्या निदर्शनास आणून देत मुश्रीफ यांनी भविष्यकालीन योजना सांगितल्या. यामध्ये,‘आईस्क्रीम व चीज उत्पादनाचि विक्री, नवी मुंबई, वाशी शाखेसाठी मदर डेअरीची जागा खरेदी, पुणे शाखेसाठी जागा खरेदी प्रस्तावित आहे. दिशा प्रोजेक्ट, वासरु संगोपन योजनेमार्फत ५०० वासरे तयार करणे, सीएनजी व इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन उभारणी, सिताफळ, अंजीर व गुलकंद बासुंदी उत्पादनाचे नियोजन असल्याचे सांगितले. संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले.
सभेला संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, सुजित मिणचेकर, बाळासाहेब खाडे, अंबरिश घाटगे, अजित नरके, प्रा. किसन चौगले, करणसिंह गायकवाड, अभिजीत तायशेटे, चेतन नरके, नंदकुमार ढेंगे, एस. आर. पाटील, रणजितसिंह पाटील, बाबासाहेब चौगले, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर, राजेंद्र मोरे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव उपस्थित होते.
……………
‘संघाचे कार्यक्षेत्र संपूर्ण कोल्हापूर जिल्हा असून गावे व संस्थांची संख्या पाहता संचालक मंडळाची संख्या अपुरी आहे. यामुळे संचालकांची संख्या २५ करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मांडलेला ठराव मंजूर करण्यात आला. सभेत पोटनियम दुरस्ती करण्यास मंजुरी मिळाली. संचालिका महाडिक यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते, त्यांच्या शंकेचे निरसन केले आहे. सभेत मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली जातील. शिवाय सभासदांनी जे प्रश्न विचारले होते, त्याची उत्तरे दिली आहेत. दोन तास सभा व्यवस्थित पार पडली. सभेला सभासद मोठया संख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल धन्यवाद. सभा चांगल्या रितीने पार पडली.’
-नविद मुश्रीफ, चेअरमन गोकुळ
…………………………..
‘महायुतीचा धर्म पाळत आम्ही सभा शांततेत पार पाडण्यासाठी पूर्ण सहकार्य केले. अध्यक्षांचे पूर्ण भाषण होईलपर्यत आमच्यातील एकानेही घोषणा दिल्या नाहीत. मात्र विषयपत्रिकेवरील वाचनाप्रसंगी सभासदांचे काही आक्षेप, काही गोष्टींना मी विरोध नोंदविला होता. मात्र कोणालाही बोलू दिले नाही, माईक काढून घेण्याचा प्रकार घडला. सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. विषयपत्रिका व प्रश्नोत्तरांच्या वाचनाप्रसंगी त्यांच्या समर्थकांनी हुल्लडबाजीचा प्रकार केला. मोठमोठयाने घोषणा देत होते. सभासदांना प्रश्न विचारता आले नाहीत. संचालक संख्या वाढीला आम्ही विरोध् नोंदविला आहे. अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली नाहीत. चुकीच्या कामकाजाविरोधात व सभासदांच्या हितासाठी लढत राहणार.’
- शौमिका महाडिक, संचालिका गोकुळ