विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी - सागर बगाडे
schedule23 Nov 26 person by visibility 77 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘मी शून्यातून प्रवास केला आहे. आज माझ्याकडे जे काही आहे, त्यामागे मला घडविणाऱ्या माणसांचे आशीर्वाद आणि प्रेम आहे. ज्यांनी मला घडवले, तीच माझी खरी संपत्ती आहे आणि विद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी आहे.’अशा शब्दांत राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्का विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांनी व्यक्त केल्या.
कलाशिक्षक बगाडे हे शिक्षकी सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले. मास्तर प्रेमी मंचतर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार कौस्तुभ गावडे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया, कोजिमाशिचे तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे हा कार्यक्रम झाला.
सत्काराला उत्तर देताना बगाडे म्हणाले,‘ आपल्या सांस्कृतिक जीवनाची खरी सुरुवात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतून झाली. या संस्थेने मला केवळ काम करण्याची संधी दिली नाही, तर माझ्यातील कलागुणांना विकसित होण्यासाठी योग्य वातावरण आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. दिवंगत प्राचार्या शुभांगी गावडे आणि प्राचार्या डॉ. श्रुती जोशी यांनी मला लहान भावाप्रमाणे प्रेम व आपुलकी दिली. या सर्वांच्या सहवासातून आणि मार्गदर्शनातून माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली.‘
“पुढील वाटचालीत मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगताना त्यांनी या सर्व मान्यवरांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आयुष्यात मिळवलेले यश हे केवळ स्वतःचे नसून आपल्याला घडविणाऱ्या संस्था, शिक्षक, विद्यार्थी, सहकारी आणि हितचिंतकांचे आहे. या सोहळ्यातून सेवापूर्ती हा केवळ शासकीय सेवाप्रवासाचा समारोप नसून समाजासाठी नव्या जोमाने कार्य करण्याची सुरुवात आहे.’अशा शब्दांत बगाडे यांनी भावना व्यक्त केल्या.