गार्डन्स क्लबतर्फे पाच डिसेंबरला विशेष कार्यक्रम
schedule23 Nov 26 person by visibility 6 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन गार्डन्स क्लबतर्फे यावर्षी बागेच्या स्पर्धा ऐवजी नोंदणी केलेल्या बागांना भेटी देण्यात येतील. आणि सहभागी सर्व स्पर्धकांचे विशेष कौतुक ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक कार्यक्रमात करण्यात येईल. त्याचप्रमाणे दरवर्षी गार्डन्स क्लब कोल्हापूर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्प प्रदर्शन व स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुष्प स्पर्धा न घेता तसेच तीन दिवसाचा मोठा शो बागेत न घेता ५ डिसेंबर रोजी एक दिवसाचा कार्यक्रम घेण्यात येईल.
यातील प्रमुख आकर्षण म्हणजे तीन जपानी पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती महापौर रूपाराणी निकम आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, गार्डन क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमधे होणाऱ्या या कार्यक्रमात योहेई हिसाशी, गेन्या टेकेडा, आकिरा निशिओ हे सकाटा या फुलोत्पादक कंपनीचे पदाधिकारी जपानहून व सारंग कीर्तने व हालेश सी हे सकाटा चे भारतातील पदाधिकारी या कार्यक्रमासाठी येत आहेत.
यावेळी गार्डन्स क्लबच्या कॅलेंडर व रोजेट वार्षिकाचे प्रकाशन, उद्यान स्पर्धेमधील सहभागींचा सत्कार व सकाटा या कंपनीचे सादरीकरण पहिल्या सत्रात होईल. आणि दुसऱ्या सत्रामधे लघुपट स्पर्धेचे स्क्रीनिंग आणि १५ इकेबाना पुष्प रचनेचे प्रत्यक्ष सादरीकरण भारतीय वाद्यांच्या पार्श्वसंगीतावर करण्यात येईल. पत्रकार परिषदेला नगरसेविका सृष्टी जाधव, उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, वर्षा वायचळ, डॉ. रचना संपत कुमार, सल्लागार समिती सदस्य रविंद्र साळुंखे आदी उपस्थित होते.