आयुष्यात स्ट्रेस हा ताटातल्या मिठाईइतकाच असावा, माणसांनी अवाजवी अपेक्षा न ठेवल्यास जीवनयात्रा आनंदयात्रा बनते
schedule22 Nov 26 person by visibility 29 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘‘आयुष्यात स्ट्रेस हा असायलाच हवा; मात्र स्टेस हा ताटातल्या मिठाईइतकाच असावा. कारण आयुष्यात काही प्रमाणात ताण असेल, तरच माणूस अधिक सक्रिय होतो, स्वतःकडून अपेक्षित कामे करून घेतो आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. मात्र हा ताण प्रमाणाबाहेर वाढता कामा नये. ताणाचे योग्य प्रमाण राखणे आणि आयुष्यात समतोल साधणे महत्त्वाचे आहे. आवडीने केलेल्या कामातूनच माणूस सर्वोच्च उंची गाठतो. आयुष्याकडून अवाजवी अपेक्षा न ठेवता माणसाची जीवनयात्रा ही आनंदयात्रा असावी.’ असे मत नांदेड येथील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार मुलमुले यांनी व्यक्त केले.
कोल्हापूरमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगुले लिखित ‘औषधाच्या पलीकडे : एका सायकियॅट्रिस्टची यशोगाथा’या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवारी (२२ नोव्हेंबर २०२६) दिमाखात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जामंत्री डॉ. वीरकुमार पाटील, भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री कासोटे-पाटील, स्मिता चौगुले, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. ए. बी. पाटील, केजीएसचे अध्यक्ष डॉ. दीपक जोशी आणि स्वस्तिक हॉस्पिटलचे डॉ. निखिल चौगुले उपस्थित होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुलमुले बोलत होते.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी डॉ. चौगुले यांच्याशी असलेल्या आपल्या वर्गमित्रत्वाच्या नात्याचा उल्लेख करत पुस्तकाच्या आशयाचे कौतुक केले. माणसाला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल, तर सर्वप्रथम स्वतःचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. स्वतःच्या मनाचा आणि वर्तनाचा शोध घेतल्याशिवाय दुसऱ्याच्या भावविश्वाची जाणीव होऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले.
डॉ.चौगुले यांनी आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय प्रवासातील अनुभवांना शब्दरूप देताना या पुस्तकात तब्बल ३८ कथांमधून मानवी मनाचे विविध पैलू उलगडले आहेत. पात्रांची नावे बदलली असली, तरी या कथांमधून समाजात घडणाऱ्या वास्तव घटनांचे, मानवी स्वभावाचे, भावनिक गुंतागुंतीचे आणि मनोव्यापारांचे प्रभावी दर्शन घडते. प्रत्येक रुग्णाच्या समस्येकडे केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून न पाहता त्याच्या भावनिक विश्वाचा वेध घेतला. रुग्णाच्या वेदना समजून घेत त्याला पुन्हा आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची प्रेरणा देणारा हा प्रवास पुस्तकातून उलगडतो असे म्हणाले. डॉ. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. निखिल चौगुले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कावेरी निखिल चौगुले यांनी आभार मानले.