डी.वाय.दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी 'ती'...
schedule05 Aug 26 person by visibility 101 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन : माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने साऱ्या समाजमनावर शोककळा पसरली. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी बुधवारी (पाच ऑगस्ट २०२६) कसबाा बवडा येथील ‘यशवंत निवास’ येथे जनसागर लोटला होता. डी. वाय. पाटील यांचा मृत्यू हा साऱ्यांचाच मनाला चटका लावणारा होता. प्रत्येकाच्या डोळयात आसू, मनात आठवणींची दाटी होती. भावभावनांचा हा कल्लोळ उपस्थितांच्या मनाला स्पर्शून जाणारा. शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी हा सारा प्रसंग शब्दबद्ध केला आहे. तो पुढीलप्रमाणे…
‘एखादी व्यक्ती जाते, तेव्हा तिच्या पद, पैसा आणि प्रतिष्ठा यावरुन तिच्या मृत्यूचे मोल ठरवले जाते; पण, त्यापेक्षाही अधिक तिने माणसे किती आणि कशा प्रकारे जोडली, हा निकष सर्वात मोठा आणि महत्त्वाचा असतो. शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील आज अनंतात विलीन झाले. तत्पूर्वी, सकाळी त्यांच्या पार्थिव देहाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह डॉ. पाटील यांच्या ‘यशवंत निवास’ येथे गेलो होतो. देशभरातील मान्यवरांसह स्थानिक नागरिकांचीही आपल्या या लाडक्या व्यक्तीमत्त्वाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती. त्या गर्दीमध्ये आमच्या पुढे एक वृद्ध स्त्री चालली होती. पाठीला मोठे कुबड, कमरेत वाकलेली, हातात काठी, गरीबपण दाखवणारी अंगावरील साडी... बारीक रिपरिप पाऊस पडून गेल्यानं कधी काठी घसरायची, तर कधी अनवाणी पावलं... त्या वृद्धेकडं ना कोणाचं लक्ष होतं, ना ती कोणाची भीड बाळगून होती... तिचं लक्ष्य एकच होतं, ते म्हणजे आदरणीय दादांचं अंतिम दर्शन घ्यायचं.
ती एकेक पाऊल जपून पण निर्धारानं टाकत निघाली होती. आम्ही गतीनं तिच्या पुढं निघून गेलो, पण या क्षणापर्यंत माझं मन तिच्यापाशीच रेंगाळतंय. अशी कोणती ऊर्मी असेल की ज्यामुळं ती दादांना अखेरचं पाह्यचं म्हणून आली असेल? दादांनी तिला अशी कोणती मदत केली असेल? तिच्या नवऱ्याला काही मदत केली असेल की तिच्या मुलाला कुठं नोकरीला लावून दिलं असेल? की, दादांच्या चांगुलपणाच्या गोष्टी ऐकून या माणसाला शेवटचं एकदा पाहायला हवं, असं तिच्या मनाला वाटलं असेल. स्वतः इतक्या असहाय्य अवस्थेत असूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येण्याचं बळ तिला कुठल्या गोष्टीनं दिलं असावं? असे एक ना अनेक प्रश्न मनात उठत राहिले... तिचा हा विचार करत असताना दुसरीकडं, दादांनीही तिच्यासमवेत नेकी करून ती केव्हाच दर्यामध्ये विसर्जित केली असेल. असं कित्येकांच्या बाबतीत त्यांनी केलं आहेच. गेले दोन दिवस त्यांच्या औदार्याच्या, दिलदारपणाच्या आणि माणूसपणाच्या कित्येक गोष्टी वाचत आहे, ऐकत आहे. त्यामध्ये अशा न सांगितलेल्या, न बोलल्या गेलेल्या, माहिती नसलेल्या चांगुलपणाच्या किती तरी गोष्टी असतील, ज्या केवळ आता त्यांच्या लाभार्थ्यांच्याच मनात रेंगाळत राहतील. त्यापैकीच ती एखादी असावी...
त्या समग्र मान्यवरांच्या, प्रतिष्ठितांच्या मांदियाळीत त्या वृद्धेचं येणं माझ्या दृष्टीनं मोलाचं होतं. अशी कित्येक मंडळी त्या गर्दीत असतील. कदाचित, उद्या त्यांची नावं कुठल्या पेपरात छापून येणार नाहीत, की कोणी त्यांची दखल घेणार नाहीत. हजारोंच्या समुदायाचं एकक म्हणूनच कदाचित ती कायम गर्दीचीच ओळख अधोरेखित करीत राहतील. पण, हीच ती खरी मंडळी असतात, ज्यांच्या डोळ्यांत गेलेल्या माणसाच्या चांगुलपणाप्रती कृतज्ञतेचा एकेक अश्रू ओघळलेला असतो आणि हे अश्रूच माणसाला अमरत्व बहाल करत असतात. जिवंतपणी एखादा माणूस ओढूनताणून, धाकदपटशा करून त्याला हवं ते सारं मिळवेलही, पण गेल्यानंतर प्रजेकडून त्याला असं प्रेम मिळायचं नाही. डी.वाय. पाटील यांचं नाव या प्रेम मिळवणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झालं आहे... त्यांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली!