साहित्यिक प्रा.चंद्रकुमार नलगे हे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कणा : डॉ. शशिकांत चौधरी
schedule04 Aug 26 person by visibility 38 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ साहित्यिक प्रा. डॉ.चंद्रकुमार नलगे महाराष्ट्रातील मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे कणा आहेत, त्यांच्या प्रेरणेतून आणि लिखाणातूनच ग्रामीण साहित्य संमेलने महाराष्ट्रात सुरू झाली. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ते संस्थापक होते. मराठी लेखक घडवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे, त्यांच्यामुळेच आमच्यासारखे शेकडो प्राध्यापक, लेखक घडलेअसे गौरवोद्गगार साहित्यिक डॉ. शशिकांत चौधरी यांनी काढले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी, मराठी विभाग व आयक्यूएसीद्वारे आयोजित प्रा. चंद्रकुमार नलगे : व्यक्ती , विचार व वाड्मय या विषयावरील गौरव व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. चौधरी म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, गाडगे महाराज, अण्णाभाऊ साठे आणि महाराष्ट्रातील इतर जेष्ठ साहित्यिकांचा सहवास नलगे यांना लाभला. मराठी साहित्य संमेलने सुरू करण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. रातवा, आणखीन एक जन्म, चंद्र बनातील सावल्या, लोकरंग, ग्रामीण साहित्य कथा, कादंबऱ्या यातून त्यांनी मोठे साहित्यिक योगदान दिले आहे. अंगाई सारखा चित्रपट त्यांच्या कादंबरीवरच आधारित आहे. त्यांच्या साहित्यातून अनेक चित्रपट , मालिका निघाल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्षही राहिले.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले , प्रा. चंद्रकुमार नलगे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. शहाजी महाविद्यालयात त्यांनी मराठी विभाग प्रमुख म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या व त्यांच्या सारख्या इतर प्राध्यापक सहकाऱ्यांच्या त्यागावरतीच शहाजी महाविद्यालय मोठे झाले. स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे यांनी प्रा. नलगे, डॉ.जयसिंगराव पवार ,डॉ. के. एच. ठक्कर, प्राचार्य डॉ.आबासाहेब शिंदे प्राचार्य डॉ. वामन कटाबंळे, प्रा. सुधाकर मानकर, प्रा.वराडकर, प्रा. पंगू,प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे आणि अशा इतर अनेक प्राध्यापकांना सोबत घेऊन हे महाविद्यालय वाढवले. अशा प्राध्यापकांचा गौरव व्हावा म्हणूनच या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक डॉ.डी.पी.गावडे यांनी स्वागत केले. डॉ पल्लवी कोडग यांनी सूत्रसंचालन केले. मराठी विभाग प्रमुख डॉ. डी. के. वळवी यांनी आभार मानले. माजी प्राचार्य डॉ. जी.पी माळी, डॉ.आर.डी.मांडणीकर, डॉ. ए. बी. बलुगडे,प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले,ग्रंथपाल डॉ.पांडुरंग पाटील,सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी यावेळी उपस्थित होते. शिवाजी ग्रंथालयाच्यावतीने यावेळी प्रा. चंद्रकुमार नलगे, डॉ. शशिकांत चौधरी यांच्या ग्रंथसंपदेचे प्रदर्शन झाले .