पद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कार
schedule27 Aug 26 person by visibility 208 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने, केएलई सोसायटीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. प्रभाकर बसवप्रभू कोरे यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. यानिमित्त पद्मश्री कोरे यांचा गुरुवारी, (तीन सप्टेंबर २०२६) पुणे येथे सत्कार सोहळा आयोजित केला आहे. माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या हस्ते व श्री विठृठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे. लिंगायत संघर्ष समिती, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.याप्रसंगी समाजातील कर्तबगारांचा लिंगायत समाज गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच स्मृती गौरव स्मरणिका वितरण होणार आहे. दुपारी ४.३० वाजता, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह स्वामी विवेकानंद पुतळयाजवळ बिबवेवाडी पुणे येथे हा कार्यक्रम होत आहे. वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष काका कोयटे, लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील रुकारी यांच्या नेतृत्वाखाली विविध संस्था, संघटना एकत्र येऊन हा कार्यक्रम करत आहेत. नागरिकांनी या सोहळयाला मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.