काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश ! आबिटकर, क्षीरसागर फोडणार प्रवेशाची कोंडी !!
schedule24 May 25 person by visibility 282 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काँग्रेसमधील अनेक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे काँग्रेसच्या त्या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाची कोंडी फोडतील. लवकरच त्या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होईल.”असे शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजित कदम यांनी सांगितले.
कदम म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहर विकासाला मोठया प्रमाणात निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. पालकमंत्री आबिटकर, आमदार क्षीरसागर यांच्या माध्यमातून निधीसाठी प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शहर विकासासाठी निधी मागितला होता. विविध विकासकामांना मिळून १०० कोटी रुपयांचा निधी कोल्हापूरसाठी द्यावा अशी मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामधून रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळयाभोवती स्मारक साकारण्यात येणार आहे. त्याकरिता दोन कोटी रुपयांची तरतूद आहे. शिवाजी पेठेतील फिरंगाईदेवी मंदिर विकासकामासाठी दोन कोटी रुपये मंजूर आहेत. शहरातील अन्य विकासकामासाठी निधी उपलब्ध केला आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान शहरवासियांनी विविध विकास कामे सुचविले होते. पुराचे पाणी जाते त्या ठिकाणी काँक्रिटच्या रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे.’
आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मुंबईत नुकतीच बैठक झाली. पालकमंत्री आबिटकर व आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढविल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीला जिल्ह्यात महायुतील मोठे यश मिळाले. त्याच यशाची पुनरावर्ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती करेल असा आशावादही कदम यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. प्रवेशाची कोंडी लवकरच फुटेल असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी, आशिष ढवळे, शेखर कुसाळे, वैभव माने आदी उपस्थित होते.