काँग्रेसच्या तिरंगा यात्रेद्वारे भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन
schedule24 May 25 person by visibility 142 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय सैन्यदलाबद्दल कृतज्ञता आणि सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी कोल्हापुरात काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी (२४ मे २०२५) तिरंगा यात्रा काढण्यात आली. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून या यात्रेची सुरवात झाली. भारतमातेचा आणि सशस्त्र दलाच्या तिन्ही दलांसाठी जयघोष करत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात ही तिरंगा यात्रा काढण्यात आली. खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा यात्रा निघाली.
हातात तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. यात्रेच्या सुरुवातीला भला मोठा तिरंगा ध्वज, त्याचबरोबर सुरुवातीला माजी सैनिक, त्या मागे काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या, आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी अशी शिस्तबद्धरित्या ही तिरंगा यात्रा झाली. भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषांनी मार्ग निनादला. ही यात्रा सीपीआर चौक, महानगरपालिका, भवानी मंडप आणि त्यानंतर बिंदू चौक या ठिकाणी पोहोचली. दरम्यान यात्रा मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. बिंदू चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूब आवळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राहूल देसाई, शशांक बावचकर, राजेश लाटकर, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, शशिकांत खवरे, माजी नगरसेवक राहुल माने, मधुकर रामाणे, संजय मोहिते, ईश्वर परमार, दुर्वास कदम, तौफीक मुल्लाणी, गोपाळराव पाटील, विद्याधर गुरबे, माजी सैनिक, एन. एन. पाटील, रघुनाथ पाटील, रत्नाकर शिरोळे, तानाजी चव्हाण, शिवाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
……………………..
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी मूळ विषयावर बोलावे
“ दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा मूळ विषयावर त्यानी बोलावे. दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्यदल जे पाऊल उचलेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल. त्यामुळे सैन्य दलाच्या सन्मानार्थ काँग्रेसच्याकडून आम्ही तिरंगा यात्रा काढत आहोत. पहलगाम हल्ल्यानंतर, भाजपकडून सातत्याने काँग्रेसवर टिका करण्यात येत असल्याने यावर बोलतांना त्यांनी जे सत्य आहे ते जनतेसमोर आले पाहिजे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काही प्रश्न संसदेत उपस्थित केले. विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसची मागणी आहे. यावर भाजपने बोलले पाहिजे. काँग्रेस म्हणून सैन्य दलाला पाठबळ देणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे ही काँग्रेसची भूमिका आहे.”
- सतेज पाटील, आमदार