आपत्ती नियंत्रणासाठी ९६३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता, कोल्हापूरच्या विकासांसाठी काम करू शकलो हे माझे भाग्य-राजेश क्षीरसागर
schedule25 May 25 person by visibility 52 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर, सांगली-मिरज – कुपवाड व इचलकरंजी शहरात हवामान बदलावर आधारित पूर, उष्णतेची लाट, वादळ या सारख्या आपत्तींपासून होणारे परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजनेबाबत राज्य सरकारच्या मित्र संस्थेच्या माध्यमातून ३२०० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाकडून ९६३ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूरच्या विकासकामासाठी काम करू शक्यतो हे माझे भाग्य आहे. नेतृत्वाने माझ्यावर सातत्याने विश्वास दाखविला अशी भावना क्षीरसागर यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत.दरम्यान पूर आपत्ती नियंत्रण अतंर्गत सद्यस्थितीत प्रामुख्याने यातील महापालिका क्षेत्रातील पुराच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा उभारणे, सल्लागाराची नियुक्ती करणे, प्रकल्प अमलबजावणी युनिट साठी प्रकल्प व्यवस्थापन व तांत्रिक सल्लागार नियुक्ती करणे या कामासाठी निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात पुराचे पाणी मराठवाडा, विदर्भ, धाराशिव भागांकडे वळविण्यात येणार आहे. याकरिता सुमारे १० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पावर सरकारचे काम सुरु असून, हाही प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार आहे.