गोकुळवर प्रशासक नियुक्त, पाच अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळ
schedule04 May 26 person by visibility 376 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोेल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर अखेर प्रशासकाची नियुक्ती झाली. विद्यमान संचालक मंडळाची मुदत चार मे रोजी संपत असल्याने प्रशासक नेमण्यात आले.पाच अधिकाऱ्यांचे हे प्रशासकीय मंडळ आहे. विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्याकडून् प्रशासकीय मंडळाच्या नियुक्ती जाहीर करण्यात आली. मंगळवार, पाच मे २०२६ पासून गोकुळचा कारभार प्रशासक मंडळाकडे असणार आहे.
सातारा येथील जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक हे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष आहेत. चंदगडचे सहायक निबंधक प्रदीप मालगावे, मुळशीचे सहायक निबंधक सुनील धायगुडे, विशेष लेखापरीक्षक सागर बलकवडे, धर्मादाय रुग्णालयाचे अध्यक्ष चंद्रकांत परुळेकर यांचा प्रशासक मंडळात समावेश आहे.
गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळीत शह, काटशहाचे राजकारण सुरू होते. गोकुळमध्ये सत्ता महायुतीची सत्ता आहे. दरम्यान महायुतीमधील नेतेमंडळीमध्ये टोकाचे मतभेद आहेत. अवसायन प्रक्रियेतील १३०० संस्थांची चौकशी झाली पाहिजे यासाठी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, गर्जन संघटनेचे प्रकाश बेलवडे यांनी उघड तक्रारी केल्या. आमदार पाटील यांनी तर मंत्री हसन मुश्रीफ, चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्याविरोधात तोफा डागल्या. अवसयान प्रक्रियेतील संस्थांच्या मतदान पात्रतेवरुन दोन्ही बाजू कोर्टाच्या पायऱ्या चढल्या. सर्किट बेंचने संबंधित संस्थांची चौकशी व निर्णय होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत आणि त्या संस्थाची अवसायन प्रक्रियेची चौकशी व निर्णय लवकर घ्यावा असे आदेश दिले आहेत.
दरम्यान गोकुळवर प्रशासक नेमू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नेतेमंडळींनी प्रयत्न झाले. मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री आबिटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने, गोकुळवर प्रशासक नेमू नये. निवडणुका त्वरित घ्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना केली होती. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहकार संस्थाच्या नव्या कायद्यानुसार संचालक मंडळाची मुदत संपत असेल तर प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया होईल असे मुंबईतील बैठकीत स्पष्ट केले होते.