बारावीत निकालात कोल्हापूर विभागाची घसरण, राज्यात सहाव्या स्थानावर
schedule02 May 26 person by visibility 201 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बाराव्या परीक्षेत नेहमी पहिल्या चार क्रमांकात स्थान असणाऱ्या कोल्हापूर विभागाच्या निकालात यंदा घट झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागाच्या निकालाची टक्केवारी यंदा ८९.९७ टक्के इतकी आहे. निकालाच्या टक्केवारीत राज्यात कोल्हापूर विभाग सहाव्या क्रमांकापर्यत घसरला. कोकण विभाग यंदाही ९४.१४टक्के गुण प्राप्त करत अव्वल स्थानावर राहिला. तर पुणे विभागाचा निकाल ९१.२५ टक्के इतका लागून दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमरावती विभाग असून तृतीय क्रमांकावर असून निकालाची टक्केवारी ९०.९२ टक्के इतकी आहे. नाशिक विभागाच्या निकालाची टक्केवारी ९०.७२ टक्के इतका असून चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई विभाग पाचव्या स्थानी असून निकालाची टक्केवारी ९०.०८ टक्के इतकी आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दोन मे २०२६ रोजी बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. कोल्हापूर बोर्डाचे सचिव अनुराधा म्हेत्रे, सहायक सचिव गजानन उकिर्डे, लेखाधिकारी प्रणिती जमदग्नी, वरिष्ठ अधीक्षक मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पुणे येथून ऑनलाइनद्वारे कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती दिली. कोल्हापूर विभागाचा निकाल गतवर्षी ९३.६४ टक्के इतका होता. आणि कोल्हापूर विभाग हा राज्यात द्वितीय स्थानी होता. यंदा मात्र कोल्हापूर विभागाला निकालाच्या टक्केवारीत आपले स्थान कायम टिकविता आले नाही. कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावरुन सहाव्या स्थानापर्यत घसरला. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालात ३. ६७ टक्के इतकी घट झाली आहे.
कोल्हापूर विभागात समाविष्ठ तीन जिल्ह्यातील १०१९ ज्युनिअर कॉलेज आहेत. १७७ परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली होती. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९१.८६ टक्के इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून ४८२१८ इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४७८३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ४३९४६ विद्यार्थी आहेत.सांगली जिल्हयाचा निकाल ८६.१० टक्के इतका आहे. सांगली जिल्ह्यातून ३११२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३०,८०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि २६५२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सातारा जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९०.८९ टक्के इतकी आहे. सातारा जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३२१३५ इतकी आहे. प्रविष्ठ विद्यार्थी ३१८२४ इतके आहेत. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २८९२५ इतकी आहे. कोल्हापूर विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यामध्ये मुलांची टक्केवारी ८५.५२ टक्के इतकी आहे. तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८१ टक्के इतकी आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९.२९ टक्के जादा आहे.
दरम्यान बारावी परीक्षेत लातूर विभागाचा (८४.१४ टक्के ) सर्वात कमी निकाल आहे. राज्यात लातूर विभाग नवव्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग हा राज्यात सातव्या स्थानी असून निकालाची टक्केवारी ८८.६८ टक्के आहे. नागपूर विभाग आठव्या स्थानावर असून निकालाची टक्केवारी ८८.६७ टक्के इतकी आहे.