शिवाजी विद्यापीठाचे शाहू्प्रेम ! लोकराजावर पाच भाषेत गोष्टीरुपात सचित्र पुस्तक निर्मिती !!
schedule20 Jun 25 person by visibility 74 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : सामान्य माणूस सन्मानाने जगावा, दलित-बहुजनांना न्याय मिळावा, कष्टकरी-शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलावा, गरीबांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहोचावी…आणि रयतेच्या उन्नतीसाठी राज्याची तिजोरी रिती करणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. लोकराजा म्हणून बिरुदावली लाभलेला हा एकमेव राजा. या राजाची कर्तबगारी शालेय मुलांना समजावी, भाषिक सीमा ओलांडून सगळयांना प्रेरणादायी ठरावी म्हणून शिवाजी विद्यापीठाने एक महत्वाकांक्षी प्रकल्प मूर्त रुपात आणला. राजर्षी शाहू महाराज यांच्यावर गोष्टीरुपात सचित्र पुस्तक निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नडसह पाच भाषेत पुस्तक साकारले आहे. त्यातून शाहू महाराजांचे चरित्र उलगडणार आहे.
‘असे होते आपले शाहू महाराज’ या नावांनी हे पुस्त आहे. यामध्ये शाहू महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग गोष्टीरुपात मांडले आहेत. त्यांचे विचार आणि मोठी कामे शाळकरी मुलांपर्यंत पोहोचविणे हा त्यामागील मुख्य उ्ददेश आहे. विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी अतिशय परिश्रम घेऊन राजर्षी शाहू महाराजांचा चरित्रपट साकारला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या १५० व्या जन्मवर्षाची आठवण म्हणून शिवाजी विद्यापीठाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांचे चरित्र प्रकाशित करण्याचा संकल्प केला होता. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हे काम प्रा. मोरे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानुसार मोरे यांनी, ’’असे होते आपले शाहू महाराज’ या सचित्र –चरित्रपटातून लोकराजाचे कर्तृत्व उलगडले आहे.
या पुस्तकाविषयी बोलताना डॉ. मोरे ‘शिवाजी विद्यापीठाने सोपवलेली जबाबदारी माझ्यासाठी एक अनमोल संधी होती. ती मी खूप आनंदाने स्वीकारली आणि या चरित्र लेखनात काही प्रयोग केले.’असे सांगितले. दत्तक विधान प्रकरणापासून पुढील सारा इतिहास गोष्टीरुपात मांडला आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्यकर्तृत्व अफाट. समाजातील प्रत्येक घटकासाठी मोठे काम केले. शिक्षण, आरोग्य, शेती, दुष्काळ निवारण, जलसिंचन, उद्यमशीलता…या साऱ्यांच्या माध्यमातून जनतेचे जीवनमान उंचाविण्याला प्राधान्यक्रम होता. त्यातील निवडक प्रसंग निवडने आहेत. त्यांच्या जीवनातील संस्कारमूल्ये, नीतीमूल्ये, जीवनमूल्ये शालेय मुलांसाठी प्रेरणादायी ठरतील अशा पद्धतीने मांडणी केली आहे. महत्वाचे म्हणजे छत्रपत शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य संकल्पनेच्या कक्षेत राजर्षी शाहू महाराज यांनी काम केले. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेला मूर्त रुप दिले. लोकराजाची ही कर्तबगारी आता गोष्टीरुपात शालेय मुलांसमोर उलगडणार आहे. या पुस्तकात ४५ चित्रे आहेत. अन्वर हुसेन यांनी त्या चित्राचे रेखाटन केले आहे.
……………..
शाहू जयंतीदिनी प्रकाशन
राजर्षी शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी साजरी होते. यादिनी शिवाजी विद्यापीठातर्फे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आहे. इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम प्रकाशन समारंभ आहे. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात सकाळी ११ वाजता कार्यक्रम आहे.