अभिनेते अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपट, रविवारी प्रीमियर शो
schedule20 Jun 25 person by visibility 231 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठी नाटय आणि चित्रपट सृष्टी गाजवलेल्या स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या जीवनावर आधारीत माहितीपट बनवण्यात आला आहे. या माहितीपटाचा प्रीमिअर शो रविवारी (२२ जून २०२५) रोजी आहे. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. तर खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांचीही प्रीमिअर शोसाठी उपस्थिती असेल. कोल्हापूर ही अरूण सरनाईक यांची जन्म आणि कर्मभूमी होती. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अजरामर कलाकृतींमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. अरूण सरनाईक यांची कन्या डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी पुढाकार घेवून, हा माहितीपट बनवला आहे. अरूण सरनाईक यांच्या आयुष्याचा, कला आणि जीवन प्रवासाचा वेध घेणारा हा माहितीपट डॉ. संतोष पाठारे यांनी दिग्दर्शित केला आहे. संकल्पना विशाखा तुंगारे-देशपांडे यांची आहे. डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांची निर्मिती असलेल्या, ‘पप्पा सांगा कुणाचे,’ या माहितीपटाचा कालावधी ७५ मिनिटांचा आहे.
४ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या अरूण सरनाईक यांचा २१ जून १९८४ रोजी अपघातील मृत्यू झाला. त्यांच्या आठवणी, त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया या माहितीपटामध्ये पाहता येतील. रविवारी सकाळी साडेदहा वाजता देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात या माहितीपटाचा प्रीमिअर शो होणार आहे. त्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनावरील माहितीपटाच्या प्रीमिअर शो साठी कोल्हापुरकरांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन रणजित नाईकनवरे आणि डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी केले आहे.