Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हाज यात्रेकरुंचे कोल्हापूर विमानतळावर स्वागततज्ज्ञ डॉक्टरांचे शनिवारी ओळख मधुमेहाची याविषयी मार्गदर्शनप्रधानमंत्री आवासमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक, शनिवारी पुण्यात पुरस्कार वितरणअभिनेते अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपट, रविवारी प्रीमियअर शोश्री महालक्ष्मी अन्नछत्रचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदानसलग दुसऱ्यांदा एटी स्पोर्ट्स लिंगायत प्रीमिअर लीगचा मानकरी ! बॅटरी पॉवर सोल्युशन्स उपविजेते !!कुलगुरुनंतर पुढे काय ? या प्रश्नावर डी. टी. शिर्के म्हणाले माझ्यासमोर एक मोठा....जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटससंशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंगशहरातील वाहतूक-पार्किंगला शिस्त लागणार, सुट्टीच्या दिवशी शाळांच्या मैदानावर पे अँड पार्क !

जाहिरात

 

कुलगुरुनंतर पुढे काय ? या प्रश्नावर डी. टी. शिर्के म्हणाले माझ्यासमोर एक मोठा....

schedule20 Jun 25 person by visibility 141 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘हल्ली पुढे काय?’ असा एक प्रश्न मला सातत्याने विचारला जातो आणि त्याविषयी अनेक तर्कवितर्कही लढविले जातात. मात्र, सध्या तरी माझ्यासमोर एक मोठा कोरा कॅनव्हास आहे. शेजारी विविधरंगांनी भरलेले पॅलेटही आहे. जेव्हा कधी त्या कॅनव्हासवर चित्र उतरेल, तेव्हा मी ते आवर्जून साऱ्यांना दाखवेन,’ हे उद्गगार आहेत, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के यांचे.

कुलगुरू डॉ. शिर्के हे येत्या ३० जून रोजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक म्हणून नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेमध्ये गुरुवारी (दि. १९) सायंकाळचे सत्र हे  डॉ. शिर्के यांच्या सन्मानार्थ आयोजित केले होते. त्यामध्ये देशविदेशातील संख्याशास्त्रज्ञांनी डॉ. शिर्के यांच्यासमवेतच्या सहसंबंधांना उजाळा दिला. त्यांच्या शैक्षणिक, संशोधकीय व प्रशासकीय योगदानाचा गौरव केला. या गौरव समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ आणि डॉ. शिर्के यांचे गुरू प्रा. आर.एन. रट्टीहळ्ळी होते. डॉ. सुनिता शिर्के आणि संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. रट्टीहळ्ळी यांच्या हस्ते डॉ. शिर्के यांचा कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. शिर्के यांना साडी व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास डॉ. शिर्के यांचे वडील तुकाराम शिर्के, बंधू अरविंद व मधुकर उपस्थित होते.

गौरवपर भाषणात अनेकांनी डॉ. शिर्के यांच्या हसतमुख व्यक्तीमत्त्वाचा उल्लेख केला. तो धागा पकडून डॉ. शिर्के उद्गारले, आय वील कन्टिन्यू टू स्माईल!” या कार्यक्रमात बोलताना शिर्के यांनी, आपल्या जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या शालेय जीवनापासून ते विद्यापीठीय जीवनापर्यंत सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते, म्हणाले, ‘माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला चांगले मार्गदर्शक शिक्षक मिळाले, म्हणून आजवरचा पल्ला गाठण्यात यश आले. जून १९८५मध्ये अर्थात बरोब्बर ४० वर्षांपूर्वी मी विद्यापीठात विद्यार्थी म्हणून दाखल झालो, तेथपासून हा कुलगुरू पदापर्यंतचा प्रवास याच कर्मभूमीत घडला. मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा असे सर्व काही देणाऱ्या या मातृसंस्थेच्या ऋणातून उतराई होणे अशक्य आहे. मला घडविणाऱ्यांबरोबरच समस्या निर्माण करणाऱ्यांप्रतीही मी कृतज्ञ आहे. कारण समस्याच नसत्या, तर मी त्या सोडविल्या कशा असत्या? त्यामुळे या प्रवासात त्यांचे श्रेयही मोठे आहे.’

कुलगुरू पदापर्यंत झेप घेऊनही जमिनीशी घट्ट राहणारा प्रशासक....

अमेरिकेतील मिसीसिपी स्टेट विद्यापीठाचे प्रा. प्रकाश पाटील, ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. शिवाजी डिसले, डी.जी. गोडसे, दिनेश हेलवाडे, रिझर्व्ह बँकेचे मधुसूदन अडकी, प्रा. बी.व्ही. धांद्रा, आयआयटी-तिरुपतीचे प्रा. एन. बाळकृष्ण, पंजाबच्या प्लाक्ष विद्यापीठाचे प्रा. टी.व्ही. रामनाथन, आयआयटी-मुंबईचे प्रा. सुब्रमण्यम, गुजरातचे प्रा. के. मुरलीधरन, आयआयएससी- बेंगलोरचे प्रा. शिरीष शेवडे, प्रा. व्ही.बी. घुटे, प्रा. एल.आर. शिंदे, प्रा. एस.रवी, टेक्सास विद्यापीठाचे प्रा. संजय शेटे, प्रा. आशिष सेनगुप्ता, प्रा. एच.व्ही. कुलकर्णी, प्रा. दत्तात्रय काशीद यांनी मनोगते व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे माजी संख्याशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम.एस. प्रसाद यांनी शिर्के यांना व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या. प्रा. एस.आर. कुलकर्णी यांनी पत्राद्वारे आपल्या भावना कळविल्या. कोणत्याही समस्येवर तत्परतेने उपाय सुचविणारा, समस्या सोडविण्याला प्राधान्य देणारा उत्तम संख्याशास्त्रज्ञ, तंत्रज्ञानाभिमुख, विद्यार्थीप्रिय, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य देणारा शिक्षक, कुलगुरू पदापर्यंत झेप घेऊनही जमिनीशी घट्ट राहणारा प्रशासक, आपत्ती व्यवस्थापन कुशल, प्रसन्नचित्त व हसतमुख व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेला माणूस अशा अनेक विशेषणांसह स्तुतीसुमनांचा वर्षाव करीत कुलगुरू शिर्के यांच्या शैक्षणिक आणि संशोधकीय कारकीर्दीचा गौरव केला. डॉ. सुकुमार राजगुरू यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सोमनाथ पवार यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes