बिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार- आमदार सतेज पाटील
schedule24 Aug 26 person by visibility 142 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सध्या गोकुळच्या बिनविरोध निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही. जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यासाठी गोकुळमध्ये एकहाती सत्ता असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ही निवडणूक मी पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. आमदार पाटील यांनी करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन संवाद साधला यावेळी गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नसून मी पॅनल उभे करून दूध संघाची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी करवीर तालुक्यातील कांडगांव, देवाळे, हळदी, सडोली खालसा, गाडेगोंडवाडी, आरे, बाचणी, हिरवडे खालसा, हसूर, पाटेकरवाडी, म्हालसवडे, कांचनवाडी आणि सावर्डे दुमाला या गावांमधील ठरावधारकांची भेट घेऊन संवाद साधला.
गेल्या पाच वर्षांत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. दुधाला दोन रुपये दर वाढ देण्याचा शब्द आम्ही दिला होता तो पूर्ण करून ५ वर्षात म्हैशीस १४ रुपये व गाई दुधास १० रुपये अधिक दर देण्याचे काम आम्ही केलं. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आणि ठरावधारकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास असून संपूर्ण करवीर तालुक्यातून अत्यंत सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रचारा दरम्यान सडोली खालसा येथे आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार संपतराव पवार-पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य क्रांतीसिंह पवार-पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोलताना माजी आमदार संपत पवार पाटील यांनी, गेल्या पाच वर्षांत गोकुळ दूध संघात उत्तम काम झाले असून दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांना योग्य दर देणे ही मोलाची कामगिरी आपल्या हातून घडली आहे अशा शब्दांत कामाचे कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, अभिषेक तायशेटे, प्रकाश पाटील, एम. के. पाटील, रणजीतसिंह पाटील, माजी संचालिका उदयानी साळुंखे, शशिकांत खोत, उदय पाटील, रणधीर मोरे, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, युवराज पाटील, एस. बी. पाटील, सचिन पाटील, सर्जेराव भोसले सहभागी झाले होते.