कोल्हापूर फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार ! कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद भरविणार !!
schedule24 Aug 26 person by visibility 102 category
महाराष्ट्र न्यूज वन : ‘महास्ट्राईड’ अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील जिल्हा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्ह्याने १०० टक्के गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल ‘कोल्हापूर फर्स्ट’ व संलग्न विविध संस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय राठोड यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
‘कोल्हापूर फर्स्ट’चे चेअरमन सुरेंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष गौरवपत्र फ्रेम करून जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान केले. याप्रसंगी जैन म्हणाले, ‘आता पुढील काळात कोल्हापूरचा विकास अधिक झपाट्याने व्हावा, यासाठी ‘कोल्हापूर फर्स्ट’तर्फे कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.’
“कोल्हापूर जिल्हा विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून महाराष्ट्रात प्रथम आला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या यशाचे श्रेय जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी विजय राठोड आणि या कामासाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांना जाते. त्यांचा गौरव करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. ‘कोल्हापूर फर्स्ट’चे ब्रीदवाक्य ‘नेक्स्ट जनरेशनला अपेक्षित कोल्हापूर घडवणे’ हे असून, त्यानुसार भविष्यातील पिढीच्या गरजा लक्षात घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांतील घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जैन यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सहकार्याचा उल्लेख करत जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन केले. “मुख्यमंत्र्यांची विकासाची दृष्टी आणि कोल्हापूरच्या विकासासाठी घेतले जाणारे निर्णय महत्त्वाचे आहेत. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेत कोल्हापूर जिल्हाही विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ‘कोल्हापूर फर्स्ट’ संलग्न संस्था कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, स्मॅक चे अध्यक्ष जयदीप चौगले, उपाध्यक्ष भरत जाधव, ऑ. सेक्रेटरी रणजीत जाधव, खजानिस बदाम पाटील, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानबाग, ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे, कोल्हापूर फर्स्टचे सहसचिव जयदीप पाटील, विशेष निमंत्रित सदस्य सचिन मेनन, जितूभाई शाह आदी उपस्थित होते.