राज्यस्तरीय तेली समाजाच्या व्यासपीठावर मंत्री बावनकुळे - विजय वडेट्टीवारांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ! पक्ष प्रवेशाची ऑफर, एक नंबर मंत्रीपदासाठी शुभेच्छा!!
schedule23 Aug 26 person by visibility 180 categoryराजकीय
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार विजय वडेट्टीवार दोघेही मोठे नेते. दोघेही वेगवेगळया पक्षात. एक जण भारतीय जनता पक्षात तर एक जण काँग्रेसमध्ये. दोघांचीही आपआपल्या पक्षात ताकत. वजनदार राजकारणी म्हणूनही ओळख. दोघांच्या पक्षीय विचारधारा भिन्न. मात्र एक गोष्ट कॉमन, ते म्हणजे हे दोन्ही नेते तेली समाजाचे. या दोन्ही नेत्यांमध्ये रविवारी, (२३ ऑगस्ट २०२६) कोल्हापुरात राज्यव्यापी तेली समाजाच्या मेळाव्यात राजकीय जुगलबंदी रंगली. दोघांनीही एकमेकांचे मुक्तकंठाने प्रशंसा केली. तसेच राजकीय चिमटेही काढले. मंत्री बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना उद्देशून, ‘फार काळ विरोधी पक्षात राहू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझे असे दोघांचेही वडेट्टीवार मित्र आहेत.’अशी गुगली टाकली. दरम्यान भाषणात वडेट्टीवार यांनी, ‘मंत्री बावनकुळे हे राज्य मंत्रीमंडळातील दोन नंबरचे मंत्री आहेत. लवकरच ते नंबर एकचे मंत्री बनोत’अशी कोटी केली. या दोघांच्या राजकीय टोलेबाजीमुळे कार्यक्रमस्थळी हास्याचे फवारे उडाले.
महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभेच्या माध्यमातून कोल्हापुरात नष्टे लॉन येथे राज्यव्यापी तेली समाजाचा मेळावा आयोजित केला होता. आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजीराव पाटील, महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभेचे रामभाऊ तडस, भूषण कर्डिले, शिवाजी कर्डिले, गजानन शेलार, अशोक व्यवहार, संजय विभूते, बळवंत चौधरी, सुनील चौधरी, पोपटराव गवळी, निलेश संकपाळ आदींच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला.
या मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांचे पहिल्यांदा भाषण झाले. वडेट्टीवार यांनी भाषणाच्या प्रारंभीच मंत्री बावनकुळे यांना उद्देशून ‘माझ्या आमदारकीच्या गेल्या तीस वर्षाच्य कालावधीत इतके धडाकेबाज निर्णय घेणारा महसूलमंत्री मी पहिल्यांदा पाहत आहे. बावनकुळे हे राज्य मंत्रीमंडळातील दोन नंबरचे मंत्री आहेत. त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यांचा शब्द कोणी खाली पडू देत नाही. लवकरच ते नंबर एकचे मंत्री बनावेत आणि जे एक नंबरचे आहेत ते आणखी पुढे जातील. तसे वारे सध्या वाहत आहेत. यामुळे काळजी करायचे कारण नाही, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.’असे म्हणताच पुन्हा एकदा कार्यक्रमस्थळी हंशा पिकला.
‘राजकारणात सत्ताधारी मंडळींना काही मर्यादा पडतात. समाजासाठी काही गोष्टी करायच्या म्हटल्या की अडचणी उभ्या राहतात. विरोध होण्याची शक्यता असते. पण तुम्ही काही बिनधास्त राहा, विरोधक म्हणून सभागृहात आम्ही समाजहिताच्या मागण्या करतो, तुम्ही त्यानुसार घोषणा करा. जिल्ह्याजिल्ह्यात समाज भवनसाठी जागा द्या, आर्थिक महामंडळाला भरीव निधी द्या. राजकारणात काही प्रश्न विरोधकांनी मांडावे लागतात. आपल्या माणसाला आपणच मोठं केले पाहिजे, ही समाजाची भूमिका असली पाहिजे. आम्ही आता विरोधी आहोत. काँग्रेसला २०२९ ला संधी दिसते. तेव्हा मी मंत्री झाल्यानंतर कोणी तरी तारीफ करायला पाहिजे की नाही…’अशी मिश्किल टिप्पणी वडेट्टीवार यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे पाहत केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री बावनकुळे होते. वडेट्टीवार यांनी केलेल्या राजकीय विधानावर मंत्री बावनकुळे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. बावनकुळे म्हणाले, ‘मी दोन वेळेला जिल्हा परिषद सदस्य, पाच वेळेला आमदार म्हणून निवडून आलो. पक्ष, नेते आणि जनतेने विश्वास दाखविल्यामुळेच ही झेप घेऊ शकलो. राजकारणात विरोधी पक्षाची भूमिका ही लोकांचे प्रश्न मांडायची असते. आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका ही नम्रपणे त्या सूचनांचा स्वीकार करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याची असते. सरकार म्हणून निर्णय घेण्याची जबाबदारी आमची आहे. चलो जलाए दीप वहाँ, जहाँ अभी अंधेरा है या भावनेने आम्ही काम करत असतो. सर्वच समाज घटकांच्या पाठीशी सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका साऱ्यांना न्याय देण्याची आहे. गेली तीस वर्षे मी त्यांच्यासोबत काम करत आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि मी असे दोघेही वडेट्टीवार यांचे मित्र आहोत. त्यांनी एखाद्या विषयासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे कागद दिला की झटपट त्या कामाचा निपटारा होतो. वडेटटीवार हे प्रचंड अनुभवी आणि ताकतवान नेते आहेत. विरोधी पक्षाचा आवाज म्हणजे वडेट्टीवार असे आम्ही मानतो. ते सभागृहात बोलत असताना आम्ही सत्ताधारी सभागृहातून बाहेर पडत नाही. मी, ज्या पद्धतीने पक्षनेत्यांचा, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास संपादन केला आहे तसाच विश्वास हा वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांचा केला आहे. मात्र मी सांगू ईच्छितो की, आता त्यांनी, फार काळ विरोधी पक्षात राहू नये. २०२९ तर सोडा, २०४७ पर्यंत विरोधकांना सत्तेची संधी दिसत नाही.’ त्यांच्या या विधानावर उपस्थितांची हसता हसता पुरेवाट झाली.
.............
पंधरा दिवसात बैठक, समाजाचे प्रश्न सोडवू
‘संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकाला भरीव निधी, तेली समाज भवनसाठी प्रत्येक जिल्ह्यात जागा, लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी जमीन अशा विविध १८ मागण्यासंबंधी येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊ. समाजाचे प्रश्न मार्गी लावू. महसूलमंत्री म्हणजे राज्यभरातील जमीनीचा मंत्री असतो. सरकारमधील एक घटक व समाजाचा वकील या नात्याने समाजाच्या सगळया प्रश्नांची सोडवणूक केली जाईल.’अशी ग्वाही महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली.