सीपीआरमध्ये विनाछेद यशस्वी हृदयशस्त्रक्रिया
schedule09 Aug 26 person by visibility 49 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात ५२ वर्षीय महिलेवर विनाछेद हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. त्या महिला रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच मेंदूशी संबंधित आजार असल्याने शस्त्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती. प्रकृती खालावल्याने त्या महिलेला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. मेंदूशी संबंधित आजारी रुग्णांवर कॅरोटिड आर्टरी स्टेटिंग या प्रकारातील शस्त्रक्रिया सीपीआरमधील पहिलीच शस्त्रक्रिया आहे. कार्डिओलॉजिस्ट डॉ. अक्षय बाफना व त्यांच्या वैद्यकीय पथकाने विविध तपासण्या केल्या. या तपासणीत तिच्या मेंदूमध्ये रक्तपुरवठा कमी व रक्तस्त्राव झाल्याचे आढळले. तसेच रक्तवाहिन्या अरुंद झाल्या होत्या. या शस्क्रियेदरम्यान सात मिलिमीटर बाय चाळीस मिलिमीटरचा कॅरोटिड स्टेंट बसविण्यात आला. या शस्त्रक्रियेमुळे मेंदूतील रक्तस्त्रावही थांबला. तसेच स्टेन्ट यशस्वीरित्या खुला झाला. महिलेच्या दृष्टीमध्ये व हातांच्या हालचालीत फरक पडला. शस्त्रक्रियेसाठी बाफना यांना, डॉ. स्फूर्ती जाधव, डॉ. विदुर कर्णिक, डॉ. अजित हांगे, मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. तृप्ती पवार, भूलतज्ज्ञ डॉ.अजिंक्य काळे यांचे सहकार्य लाभले.