गोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतील
schedule05 Nov 26 person by visibility 72 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालक म्हणून कुणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, एक्सपर्ट माणसंच निवडली जातील. माझा मुलगा अगर कुणीही तज्ञ संचालक होणार नाहीत. जे या क्षेत्रातील तज्ञ असतील त्यांच्याच नेमणुका सरकार करेल. कोणत्याही राजकीय पक्षाशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या तज्ञ व्यक्तींचीच नियुक्ती सरकार करेल, असे मला वाटते.’असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. मुंबई येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
गोकुळ दूध संघाच्या उपविधीमुळे निर्माण झालेली संभ्रमावस्था संपवण्यासाठीच सरकारने संचालक संख्या वाढीची कार्यवाही केली आहे. त्यामुळे लोकशाही जिवंत राहून साडेपाच लाख दूध उत्पादकांना न्याय मिळणार आहे.असे ते म्हणाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी गोकुळमध्ये मत चोरी झाल्याचा आरोप करीत असल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गोकुळचा विषय तसा नाही. राहुल गांधी यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणीही मत चोरीच दिसते. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सभासदांनी अजबच असा कौल दिला. यामध्ये समविचारीला १३ जागा आणि महायुतीला १२ जागा असे बलाबल दिले. दरम्यान; या संस्थेचा कोरम हा १४ चा आहे आणि कोरम पूर्ण झाल्याशिवाय अध्यक्ष निवड होऊ शकत नाही. बाय लॉजमध्ये कोरमसाठी असलेली अट पूर्ण करणे हे बंधनकारक होते.
दरम्यान; आठवड्यापूर्वीच्या अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे १२ सदस्य गैरहजर राहिले आणि कोरम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे येत्या १० तारखेच्या अध्यक्ष निवडीच्या सभेलाही हीच परिस्थिती उद्भवली असती. महाराष्ट्र निवडणूक रूल प्रमाणे अशी दोन किंवा तीन वेळा अध्यक्ष निवडीची सभा तहकूब झाल्यास प्रशासक नेमावा अशी तरतूद आहे आणि प्रशासक नेमल्यानंतर निवडणूक लावावी, अशीच तरतूद आहे.असा इतर कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये जो बायलॉज नाही तो गोकुळ दूध संघामध्ये, जे या विषयाची माहिती न घेता गैरसमजातून आरोप करीत आहेत गोकुळ दूध संघाच्या बायलॉजमुळे तयार झालेला हा डेडलॉक आहे तो समजून घेण्याची गरज आहे. असे मुश्रीफ म्हणाले.