कोरे पॉलिटेक्निक येथे विद्यार्थी परिचय - मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
schedule02 Aug 26 person by visibility 18 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), वारणानगर येथे प्रथम वर्षाच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात झाला. .
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना वारणा शिक्षण संकुलाची वाटचाल, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती दिली. त्यांनी नवागत विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन, नावीन्यपूर्ण विचार आणि शिस्तबद्ध शिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी अभियंता होण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात तात्यासाहेब कोरे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. पाच दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये मानवी मूल्ये व व्यावसायिक नीतिमत्ता या विषयावरील विशेष व्याख्यान, प्रश्नमंजुषा व विविध उपक्रम महाविद्यालयातील विविध समिती व विभागांची माहिती, विज्ञान उद्यान व आदर्श प्रयोगशाळा भेट, विभागीय भेट, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन तसेच पन्हाळा किल्ल्याची ऐतिहासिक शैक्षणिक सहल अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य प्रा. पी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभियंता म्हणून आवश्यक असलेले गुण, शैक्षणिक शिस्त व करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सल्लागार डॉ. पी. एम. पाटील यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्यविकास, नवोपक्रम आणि स्पर्धात्मक तयारीचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. शैक्षणिक समन्वयक प्रा. एस. व्ही. सुर्वे व प्रवेश समन्वयक प्रा. ए. एन. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. प्रा. ए. व्ही. पाटील यांनी आभार मानले.