शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता -आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज : शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत
schedule01 Aug 26 person by visibility 38 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर ‘ प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.’असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी केले.शिरोळ तालुका मुख्याध्यापक संघाच्यावतीने जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर, जयसिंगपूर येथील जनतारा हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय संवाद बैठक उत्साहात पार पडली. याप्रसंगी शिक्षणाधिकारी सावंत बोलत होत्या. विनाअनुदान कृती समिती राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी सावंत यांनी, ‘महापूर काळात घ्यावयाची दक्षता, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामकाज’ याविषयी सखोल मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी दैनंदिन कामकाजातील प्रशासकीय अडचणी, शाळांमधील कागदपत्रे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. खंडेराव जगदाळे यांनी मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेन अशी ग्वाही दिली. दरम्यान शिरोळ तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने नूतन व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. श्रीशैल मठपती यांनी प्रास्ताविक केले .यावेळी शिरोळ तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव अजितकुमार खवाटे, खजिनदार विनोद कोठावळे, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. बैठकीस शिरोळ तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.