ड्रायव्हर सीटवर खासदार, बसमध्ये नगरसेवक ! पीएमईच्या नव्या वाहनातून फेरफटका !!
schedule01 Aug 26 person by visibility 48 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एरव्ही चालक – वाहकांची ये जा, कर्मचाऱ्यांची वर्दळ आणि बसेसचा वावर असे चित्र असलेलय शास्त्रीनगर येथील केएमटी वर्कशॉपचा परिसर शनिवारी ( एक ऑगस्ट २०२६) गजबजला. शहरातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती नजरेत भरण्याजोगी. साऱ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या, नव्या बसेसवर. कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरू झाल्या होत्या. एका बसमध्ये महापालिकेचे नगरसेवक बसलेले...आणि ड्रायव्हर सीटवर भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक. खासदार महाडिक यांनी नवी बस स्टार्ट केली…तेव्हा आपसूकच महायुतीचा विजय असो अशा घोषणा दणाणल्या.
निमित्त होतं, केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेतून कोल्हापूर महापालिकेला मिळालेल्या नव्या बसेसच्या पाहणी दौऱ्याचे. पीएमई बस योजनेतून कोल्हापूरसाठी शंभर बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी दहा बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. नव्या बसेससाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी केएमटी वर्कशॉपमध्ये सुरू आहे. नव्या बसेस आणि पायाभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी खासदार महाडिक यांनी शनिवारी सकाळी केएमटी वर्कशॉपला भेट दिली. परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव यांनी खासदार महाडिक व महापालिका पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
महापौर रुपाराणी निकम, महापौर राजेंद्र भारुप, उपायुक्त पारितोष कंकाळ, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, प्रा. जयंत पाटील, सभागृह नेते मुरलीधर जाधव, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, बबन मोकाशी, चंद्रकांत संकपाळे, प्रमोद देसाई, विजय देसाई,महिला व बालकल्याण समिती सभापती दीपा ठाणेकर, नगरसेविका रेखा उगवे, नेहा तेंडुलकर, निलिमा पाटील, माधुरी व्हटकर, माधुरी किरण नकाते, पल्लवी देसाई, स्वीकृत नगरसेवक व भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, परिवहन समिती सदस्य प्रसाद जाधव, हेमंत आराध्ये भाजपचे पदाधिकारी महेश जाधव, राहुल चिकोडे, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले, पी. एन. गुरव आदींच्या उपस्थितीमध्ये बसची पाहणी केली. चार्जिंग स्टेशनचे काम पाहिले.
बस पाहणीनंतर खासदार महाडिक यांनी नवी बस चालविली. महापालिका पदाधिकारी, नगरसेवक बसमध्ये होते. ‘महायुतीचा विजय असो, भाजपाचा विजय असो’अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वर्कशॉपच्या आवारात फेरफटका मारला. यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार महाडिक यांनी, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी इलेक्ट्रिक बसेसला प्राधान्य दिले आहे. पीएम ई योजनेंतर्गत कोल्हापूरला शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत. दहा बसेस दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसेस महिनाभरात दाखल होतील.नव्या बसेसमुळे प्रवाशांना सुखकर व आरामदायी प्रवास घडेल. केएमटीची आर्थिक घडी सुधारेल.’