महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने लेखनबळ - संजय कृष्णाजी पाटील
schedule01 Aug 26 person by visibility 25 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाचा समग्र परीघ मानवतावादी आहे. संयुक्त महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने लेखनबळ दिले. मराठी साहित्याला अपरिचित असलेल्या विश्वाचे दर्शन त्यांनी घडविले. ’असे प्रतिपादन प्रख्यात कवी, नाट्यकर्मी व सिने-दिग्दर्शक संजय कृष्णाजी पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लेखन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. नंदकुमार मोरे अध्यक्षस्थानी होते. पाटील म्हणाले, अण्णाभाऊंना शाळेने अक्षर दिले नाही, पण त्यांनी मात्र मराठी साहित्याला प्रचंड शब्दभांडार दिले. या प्रतिभावंत साहित्यिकाने आपल्या एकूण कथासाहित्यात समाजातील दलित, उपेक्षित, भटके, शहरी, ग्रामीण आणि झोपडपट्टी अशा सर्व घटकांच्या समस्यांचा वेध घेतला महाराष्ट्राच्या चळवळीला अण्णा भाऊंच्या लेखणीने प्रेरणा दिली.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. मोरे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी विपुल साहित्य निर्मिती करून पुढील पिढ्यांना लेखन प्रेरणा दिली. त्यांच्या साहित्याची दिग्गज निर्माता दिग्दर्शकांना भुरळ पडली. त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपटही निघाले, तथापि, मराठी माणसांना अण्णा भाऊ खूप उशीरा समजले. लोकजीवनाला बांधून ठेवणाऱ्या अनेक साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी आपली लेखणी चालवली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी अतुलनीय योगदान दिले. त्यांचे ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवास वर्णन म्हणजे अभ्यासपूर्ण प्रवासाची दृष्टी कशी असायला हवी, याचा वस्तुपाठ आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा लेखन आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनिता मिस्कूळ, अमोल देशमुख आणि विष्णू पावले यांनी मनोगते व्यक्त केली. अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती वराळे यांनी सूत्रसंचालन केले, तर रूपाली पाटील यांनी आभार