बाळूमामा देवस्थानमधील गैरव्यवहारातील आरोपींना अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन – डॉ. युवराज येडूरे
schedule02 Aug 26 person by visibility 56 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :संत बाळूमामा देवस्थानातील कथित ६० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तेरा दिवस उलटले, तरी एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून तपासाला गती द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे डॉ. युवराज येडूरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.डॉ. येडूरे यांनी सांगितले की, देवस्थानच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या बकरी विक्री व्यवहारात सुमारे ४१ कोटी रुपये आणि जागा खरेदी-विक्री व्यवहारात सुमारे १९ कोटी रुपये, असा एकूण ६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि तामिळनाडूतील लाखो भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी झुंजाराव खडके, देवस्थानाचे तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी, तत्कालीन विश्वस्त मंडळातील काही सदस्य, व्यापारी आणि कंत्राटदार यांच्याविरोधात १९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा नोंदवूनही अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने तपासाच्या गतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी राहुल पाटील, राहुल कुंभार, विश्वजीत पाटील, प्रकाश पाटील, दिपक जरग सुशांत पाटील, प्रविण मनुगडे आदी उपस्थित होते.