लिंगायत माळी समाजाच्या सभागृह उभारणीला मोठी मदत करू - सत्यजीत कदम
schedule14 Jun 26 person by visibility 93 categoryसामाजिक
कोल्हापूर : ‘ समाजातील गुणवंत मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप, कर्तबगार व्यक्तींचा सन्मान, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा लिंगायत माळी समाजाने एकोप्याची वीण घट्ट विणली आहे. समाज संघटन करुन लिंगायत माळी समाजाचे सभागृह बांधणीचे काम सुरू केले. हे सभागृह समाजासाठी मोठे व्यासपीठ ठरणार आहे. सभागृहाच्या उभारणीसाठी मोठी मदत करू’अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम यांनी दिली.
लिंगायत माळी समाज, कोल्हापूर जिल्हातर्फे विविध पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष व नगरसेवक आदिल फरास, समाजाचे मार्गदर्शक अण्णासाहेब माळी, उद्योजक प्रभाकर कुलगुडे, गोरख माळी, लिंगायत समाजाचे राजू वाली, माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. अक्कमहादेवी मंटप येथे आयोजित या समारंभाला समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
या समारंभात हुपरी येथील कांता दत्तात्रय माळी यांना आदर्श माता पुरस्कार, निवृत्त प्राचार्य शंकरराव लक्ष्मण माळी यांना समाज रत्न पुरस्कार तर पट्टणकोडोली येथील सी. एम. माळी कुटुंबीयांना आदर्श कुटुंब पुरस्कार देऊन सन्मानित केले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. जयसिंगपूर येथील सदाशिव माळी, भिमराव माळी, इस्पुर्ली येथील शंकर सखाराम पाटील, पट्टणकोडोली येथील नंदकुमार माळी, तळदंगे येथील भाग्यश्री दिनकर माळी, हुपरी येथील शिला गोंधळी, कोल्हापुरातील अरविंद चौगले यांचाही सत्कार करण्यात आला.
नगरसेवक आदिल फरास यांनी, ‘ लिंगायत माळी समाज हा कष्टाळू वृत्तीचा आहे. कष्ट आणि जिद्दीच्या बळावर विविध क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध केली. समाजाने शैक्षणिक फंड उभारुन समाजातील गरीब मुलांची शैक्षणिक वाटचाल प्रवाहित केली आहे. समाजाच्या कार्यासाठी आपले सदैव सहकार्य राहील.’ लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी प्रास्ताविकात समाजातर्फे गरजू व हुशार मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक फंड जमा केला जात आहे. नजीकच्या काळात हा फंड वीस लाख रुपयापर्यत संकलित होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समाजातर्फे सांस्कृतिक सभागृह उभारणी करण्यात येणार आहे. सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामासाठी प्रत्येक घटकाने मदतीचा हात द्यावा असे सांगितले.
समाजाचे उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी, महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना माळी, उपाध्यक्षा वैशाली माळी, कार्याध्यक्षा विद्या माळी यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत केले. शिक्षक संतोष माळी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाला प्राचार्य जी. पी. माळी, निवृत्ती पीएसआय शरद माळी, संचालक अशोक माळी, काशिनाथ माळी, किशोर माळी, राजाराम माळी, चंद्रकांत चिपरे, गणपतराव बेलकूड, राजेंद्र माळी, संजय कोरे, योगेश माळी, राहूल माळी, श्रृती कुलगुडे, घनश्याम माळी, पांडूरंग माळी, नगरसेविका पूनम माळी, इंदू माळी आदी उपस्थित होते.