जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हंगामा, सदस्यांकडून अधिकारी सभेतून ‘आऊट’
schedule22 Jul 26 person by visibility 215 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बुधवारी, २२ जुलै २०२६ रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासन आणि सदस्य आमनेसामने उभे ठाकले. प्रशासनाच्या कामकाजावर वाभाडे काढताना सदस्यांनी विभागप्रमुखांना चांगलेच धारेवर धरले. मागील सभेत सुचविलेल्या कामांच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देणे, विभागांशी निगडीत विषयांची माहिती नसणे अशा विविध कारणावरुन सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी, ‘स्थायी समितीला सामोरे जाताना अधिकाऱ्यांनी विषयांचा अभ्यास करुन उपस्थित राहावे, मागील सभेत निर्णय झालेल्या विषयांची नेमकी सध्यस्थिती मांडावी ’असे सुनावले. तसेच ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित विभागाच्या विषयासंबंधी योग्य उत्तरे मिळाली नाहीत अशा अनेक अधिकाऱ्यांना स्थायी समिती सभेतून बाहेर पडण्याची सूचना केली. यामुळे अनेक अधिकारी स्थायी समितीची सभा अर्ध्यावर सोडून बाहेर पडले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात स्थायी समिती सभेतून एकाचवेळी अनेक अधिकाऱ्यांना बाहेर काढण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या परिसरात रंगली होती.
बुधवारी, २२ जुलै २०२६ रोजी स्थायी समितीची सभा होती. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन,बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शीतल यादव, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील, समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा गायकवाड, समिती सदस्य सुधीर देसाई, संग्रामसिंह कुपेकर, अमरसिंह पाटीलअभिजीत तायशेटे, रेश्मा राहुल देसाई, जयंत पाटील, , शिवाजी जाधव आदींच्या उपस्थितीमध्ये दुपारी एक वाजून १५ मिनिटाला सभेला सुरुवात झाली. विविध खात्याचे विभागप्रमुख व अन्य वरिष्ठ अधिकारी सभेला होते. सभेपुढे एकूण तेरा विषय होते.
सभेच्या प्रारंभी मागील महिन्यात झालेल्या स्थायी समितीतील सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. यावरुन सुरु झालेल्या चर्चेत सहभागी होताना सदस्यांनी प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार करण्यास सुरुवात केली. काही सदस्यांनी, प्रशासनाकडे मागील सभेत झालेल्या कोणकोणत्या विषयांची गेल्या महिनाभरात अंमलबजावणी झाली, अधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतले अशी विचारणा केली. यावेळी अनेक अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. सदस्यांनी, सभा तहकूब करावी अशी मागणी केली. मात्र सभाध्यक्षांनी, सभा तहकूब करणे योग्य ठरणारे नाही स्पष्ट केले.
सभेत काही सदस्यांनी, ‘आयत्यावेळी दाखल’ होणाऱ्या विषयांचा मुद्दा उपस्थित केला. ‘आयत्या वेळी दाखल’ विषयांची माहिती सदस्यांना का दिली जात नाही ? परस्पर विषय कसे मांडले जातात ? एखाद्या सभेसमोर आयत्या वेळचे विषय किती असावेत ? ’असे सवाल केले. जिल्हा परिषदेत सभागृह अस्तित्वात येऊनही सदस्य व पदाधिकाऱ्यां का विश्वासात घेतले जात नाही अशी विचारणा केली. अधिकाऱ्यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. तसेच विभागाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. त्यावर सदस्यांनी, ‘अधिकारी वर्गाकडून मोघम उत्तरे दिली जात आहेत, अभ्यास न करता स्थायी समितीला उपस्थित राहू नका.’अशा शब्दांत सूचना केली. जवळपास अर्धा ते पाऊणतास हा प्रकार सुरू होता. सदस्यांनी स्पष्ट सूचना केल्यामुळे अधिकारी स्थायी समितीमधून बाहेर पडले.
………………..
“स्थायी समितीची सभा बुधवारी झाली.सभेत विविध विषयावर सकारात्मक पद्धतीने चर्चा झाली. सदस्यांनी विविध विभागाच्या कामकाजाच्या अनुषंगाने माहिती मागितली. उपलब्ध माहिती त्यांना देण्यात आली. शिवाय ज्या विषयांची सगळी माहिती उपलब्ध नव्हती, त्यासंबंधी येत्या काही दिवसात त्यांना माहिती देण्यात येईल असे सांगितले. संवादपूर्ण व खेळीमेळीत सभा झाली.”
- डॉ. जॅसमिन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद