कोल्हापुरात चार ऑगस्टला राज्यव्यापी व्यापारी परिषद, सेस रद्दसाठी ठरणार आंदोलनाची दिशा
schedule22 Jul 26 person by visibility 97 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :कृषी उत्पन्न बाजार समितच्या सेसमुळे व्यापारी व ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत आहे. शिवाय व्यापार –उद्योगासमोरील वाढत्या अडचणी, व्यवसायावर होणारे परिणाम, दुबार कर आकारणी विरोधात पुढील दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात चार आँगस्ट २०२६ रोजी व्यापारी परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत मार्केट समितीचा सेस रद्द होण्यासंबंधी निर्णायक हाक दिली जाणार आहे. या परिषदेला राज्यभरातील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे व दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दसरा चौक परिसरातील दिगंबर जैन बोर्डिंगच्या सभागृहात ही परिषद होत आहे.
विना पर्याय मार्केट सेस रद्द व्हावे ही व्यापारी वर्गाची भूमिका आहे. ज्या प्रमाणे राज्यातील स्थानिक संस्था कर रद्द करुन सरकार महापालिकेला अनुदान देते त्याचप्रमाणे मार्केट सेस रद्द करुन बाजार समितीला अनुदान द्यावे अशी मागणी यावेळी व्यापारी प्रतिनिधींनी केली. या परिषदेत व्यापारी, व्यावसायिकांच्या विविध संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मार्केट सेस व व्यवसाय कराचा भुर्दंड व्यापाऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रदीप कापडिया, अजित कोठारी, वैभव सावर्डेकर, अमर क्षीरसागर, प्रशांत शिंदे, विजय कागले, धन्यकुमार चव्हाण, श्रीनिवास मिठारी, विवेक शेटे, किरण तपकिरे, बाबासो पाटील, राहूल नष्टे, अनिल धडाम, अजित होनाले, सुरेश इंग्रोळे, दत्तात्रय पाटील, दत्तात्रय पाटील, एकनाथ चौगुले, मंगेश विभूते, मुकुंद बोंगाळे, कपिल नलवडे, सतीश फणसे आदी उपस्थित होते.
…………………
कागल, वारणेतील नेत्यांचे पायताण घट्ट, त्या ठिकाणी सेस नाही
‘मार्केट सेस आवारासह समितीच्या आवाराबाहेरील शेतमालावरीलही मार्केट सेस रद्द होणे आवश्यक असल्याचे यावेळी व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले. कोल्हापुरात सेस आकारणी होते. मात्र कागल, वारणानगर, राधानगरी, चंदगड अशा ठिकाणी सेस आकारणी होत नाही. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ, वारणेत आमदार विनय कोरे यांचे पायताण घट्ट आहे. यामुळे त्या ठिकाणी सेस आकारणी केली जात नाही.’अशा भावना यावेळी व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.