शिवाजी स्टेडियमची नव्याने बांधणी ! अंडरग्राऊंड पार्किंग - अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी मार्ग !!
schedule28 Mar 26 person by visibility 181 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमचे डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. सध्याच्या स्टेडिअमची नव्याने बांधणी करुन, तिथे सगळया खेळांच्या सुविधा निर्माण करायच्या आहेत. स्टेडियमच्या खाली ( अंडरग्राऊंड) प्रशस्त वाहनतळाची सुविधा आणि तेथून भाविकांसाठी, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. हा प्रोजेक्ट कसा साकारता येईल, त्या अनुषंगाने काम सुरू आहे अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूरच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विषयांची मांडणी केली. हद्दवाढविषयक लक्षवेधी मांडली. घरफाळा घोटाळा, टीडीआर घोटाळा, थेट पाइपलाइन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी केली. दहा गावांच्या समावेशासह कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीस सर्वांची समंती आहे. २०२७ मधील जनगणना झाल्यानंतर कोल्हापूरची हद्दवाढ निश्चित होईल असेही त्यांनी सांगितले. जनगणनेच्या अधिकृत आकडेवारीनंतर मतदारसंघाची, प्रभागांची रचना बदलणे अनिवार्य आहे. या तांत्रिक बाबीमुळेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ लांबणीवर पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या सत्ता कालावधीतच कोल्हापूरच्या विकासकामांना चालना मिळाली, विकास योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. अनेक प्रकल्प कार्यान्वित झाले.आगामी काळात कोल्हापूर मॉडर्न हब म्हणून ओळखले जाईल, अशा पद्धतीने विकास करू असे क्षीरसागर म्हणाले. शाहू मिल, करवीर निवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, आयटी पार्क विकसित करणे, कन्व्हेन्शन सेंटरची उभारणी अशा विविध पातळीवर काम सुरू आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने अॅम्युझमेंट पार्कची संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच शहरात वाढलेले पर्यटक व प्रवाशांची संख्या लक्षात घेता पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे, वाहतुकीच्या नियंत्रणासाठी उपाययोजनेला प्राधान्यक्रम आहे.
छत्रपती शिवाजी स्टेडियमचे पूर्णत : नूतनीकरण प्रस्तावित आहे. सध्याच्या स्टेडिमची नव्याने बांधणी, तिथे सगळ्या खेळासाठी सुविधा करणे, स्टेडियमखाली वाहनतळ आणि तिथून भाविकांसाठी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी मार्गाची निर्मिती कशी करता येईल या अनुषंगाने प्राथमिक स्तरावर काम सुरू आहे. अजून सगळी प्रक्रिया प्राथमिक टप्प्यावर आहे. मात्र साऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प सुरू केला जाईल,’असे क्षीरसागर म्हणाले.
पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, रत्नेश शिरोळकर, अजय इंगवले, प्रसाद चव्हाण, नगरसेविका मंगल साळोखे, माजी नगरसेवक तात्या खेडकर, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, नेपोलीयन सोनुले, अशपाक आजरेकर, पवित्रा रांगणेकर, पूजा भोर, शहरप्रमुख रणजित जाधव, तुकाराम साळोखे, रमेश खाडे, संजय सावंत, हर्षल सुर्वे, अंकुश निपाणीकर, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, किशोर घाटगे, राहुल चव्हाण, राज जाधव, निलेश हंकारे, राजू पोवार, अल्लाउद्दीन नाकाडे, पूजा कामते, मंगल कुलकर्णी आदी उपस्थित होते.