बीओटीतून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारणीस विरोध, जीमच्या खासगीकरणाला ब्रेक ! मुख्यालयातील सुशोभिकरणाचा हिशेब सदस्यांनी मांडला ! !
schedule13 Aug 26 person by visibility 48 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरील प्रस्तावित कमर्शिलय कॉम्पलेस स्वनिधीतून करायचे, कर्ज काढून करायचे की ‘बांधा, वापरा व हस्तांतरण’ (बीओटी) तत्वावर विकसित करायचे याविषयी गुरुवारी झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीत एकमत झाले नाही. समितीमधील बहुसंख्य सदस्यांनी, बीओटी तत्वावर कमर्शियल कॉम्लेक्स विकसित करण्यास विरोध केला. हे कॉम्प्लेक्स जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ताब्यात असली पाहिजे, त्या माध्यमातून जिल्हा परिषदला उत्पन्न मिळायला हवे असा आग्रह सदस्यांनी धरला. सभापती सारिका नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सभापती नांदेकर यांनी,‘ कमर्शियल कॉम्लेक्स कशा पद्ध्तीने विकसित करणे जिल्हा परिषदेच्या हिताचे ठरले त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यामध्ये स्वनिधी, कर्ज घेऊन उभारणी, बीओटी की अन्य कोणता पर्याय या अनुषंगाने अभ्यास करुन प्रस्ताव मांडा’असे अधिकाऱ्यांना सांगितले. अखेर भाऊसिंगजी रोडवरील जागा कशा पद्धतीने विकसित करता येईल सल्लागार नेमण्याचे ठरले. त्यानंतर तो प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
कमर्शियल कॉम्लेक्सची उभारणी बीओटी तत्वावर केल्यास ते जिल्हा परिषदेच्या फायद्याचे ठरणारे नाही. भाऊसिंगजी रोडवरील ती जागा प्राइम लोकेशन आहे. जिल्हा परिषदेने सेस फंड, बँकेतून कर्ज काढून कॉम्प्लेक्स उभारावा अशा सूचना सदस्यांनी केल्या. कोणता पर्याय फायदेशीर ठरू शकेल यासंबंधी पुन्हा सादरीकरण करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी सरकारची मान्यता घ्यावी लागणार आहे याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. जिल्हा परिषदेच्या आवारातील जीम खासगी तत्वावर चालविण्यास देण्यासंबंधीचा विषय मान्यतेसाठी मांडला होता. या विषयाला सदस्यांनी विरोध केला. जीमच्या खासगीकरणाला ब्रेक लागला.
बांधकाम समितीच्या बैठकीतील चर्चेत सदस्य इंद्रजीत पाटील, राजेंद्र सुर्यंवंशी, शिरीष देसाई, अमोल चव्हाण, संभाजी पाटणकर, अमरसिंह हं. पाटील यांनी सहभाग घेतला. या बैठकीत अनेक सदस्यांनी, जिल्हा परिषद मुख्यालयातील कार्यालयांच्या सुशोभिकरणावर होत असलेलय खर्चाकडे लक्ष वेधले. प्रशासक कालावधीत सात कोटीहून अधिक रुपये खर्च करुन मुख्यालयातील विविध कार्यालयांचे नूतनीकरण केले. दरम्यान जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन पाच महिन्याचा कालावधी उलटला. अद्याप सदस्यांना विकासकामासाठी निधी मिळाला नाही. मात्र गेल्या काही महिन्यात मुख्यालयातील विविध कार्यालयावर दोन कोटीहून अधिक निधी खर्च झाल्याचे सदस्यांनी सांगितले. तसेच बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात परस्पर बदल होऊ नयेत असेही सदस्य म्हणाले.
………….
बैठकीतील प्रमुख विषय…
जिल्हा परिषद स्वनिधीतून तालुका स्तरावरील इमारती दुरुस्त करणे. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील अभिलेख कक्षाबाहेरील बाजूस उपहारग़ृहाच्या बाजूस अभिलेख कक्ष तयार करणे. महसुलात जमा करण्यात आलेली सुरक्षा ठेवीची अनामत रक्कम मागणी केल्यामुळे परत करण्याबाबत सथायी समितीस शिफारस करणे. गडहिंग्लज येथील गाळे विकसित करणे. साठ ते पंच्याहत्तर लाखमधील निविदा कामांच्या मंजुरीबाबत व ७५ लाखावरील निविदांच्या कामांना मंजुरी.यासह अन्य काही विषयासंबंधी चर्चा झाली.