कोल्हापूरकरांचा प्रवास होणार वातानुकूलित बसमधून, सुरक्षित अन् सुखकर ! केएमटीच्या ताफ्यात ई बसेस दाखल, सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत ! !
schedule30 Jul 26 person by visibility 146 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेची केएमटीची बस सेवा ही कोल्हापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची लाइफलाइन. केएमटी बसेसमधून रोज हजारो प्रवासी ये जा करत असतात. गेली अनेक दशके प्रवासी सेवेत असलेल्या केएमटीचा आता चेहरामोहरा बदलत आहे. केएमटी आता नव्या रुपात, नव्या सुविधासह प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. केंद्र सरकारच्या पीएमई बस सेवा योजनेंतर्गत वातानुकूलित इलेक्ट्रिक बस उपलब्ध होत आहेत. गुरुवार, तीस जुलै २०२६ दिवस कोल्हापूरसाठी विशेष ठरला. पहिल्या टप्यात तीन ई बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या. शास्त्रीनगर येथील केएमटी कार्यशाळेत दाखल झालेल्या या बसेसची पाहणी परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव यांनी केली.
‘केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला ९ मीटर लांबीच्या ५० आणि १२ मीटर लांबीच्या ५० अशा एकूण १०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या आहेत. येत्या दीड दोन महिन्यात आणखी बसेस दाखल होतील. आणि सप्टेंबर २०२६ पासून या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावरुन धावू लागतील. या बसेसच्या आगमनामुळे कोल्हापूरच्या पर्यावरणपूरक, आधुनिक आणि प्रवाशाभिमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.’असे सभापती सत्यजीत जाधव यांनी सांगितले.
डिसेंबर महिन्यापर्यंत १५० बसेस कोल्हापूरसाठी उपलब्ध होतील असेही जाधव म्हणाले. यामुळे शहरातील बसमार्गांचा विस्तार, ग्रामीण भागाशी कनेक्टिव्हिटी, एमआयडीसी परिसरासाठी विशेष मार्ग, तसेच पन्हाळा, जोतिबा आणि आदमापूर (श्री बाळूमामा) यांसारख्या पर्यटन व धार्मिक स्थळांसाठी नवीन बससेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले जाधव यांनी सांगितले. ब्रेकडाऊन बसेससाठी पाच जादा बसेस केएमटीला मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यातील तीन बसेस शहरात दाखल झाल्या असून, उर्वरित बसेसही टप्प्याटप्प्याने दाखल होतील. आवश्यक तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अत्याधुनिक, सुरक्षित, वातानुकूलित आणि प्रदूषणमुक्त बससेवेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या प्रकल्पासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला, तर परिवहन समितीचे सभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सत्यजित जाधव यांनी प्रकल्पाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याचेच फलित म्हणून आज पहिल्या तीन बसेसचे शहरात आगमन झाले आहे.’असे ते म्हणाले. यावेळी परिवहन समितीचे सदस्य संतोष लाड, वक्स मॅनेजर रणधीर मोरे, अमेय जाधव आदी उपस्थित होते.