मोबाईल ॲप्लिकेशनव्दारे स्वच्छ- सुजल गावासाठी सरपंच संवाद
schedule22 Jul 25 person by visibility 18 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत गावे हागणदारीमुक्त ठेवून त्यांना अधिक शाश्वत व आदर्श बनविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा प्रयत्न सुरु आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभाग वाढविण्यासाठी सरपंच संवाद हे नाविन्यपूर्ण मोबाईल ॲप्लिकेशन सुरु करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन त्या आधारे माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे. सरपंच संवाद हे ॲप्लिकेशन केंद्र शासनाच्या वतीने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. या ॲपवर सरपंच आपल्या गावातील स्वच्छता व ग्रामविकासाचे उपक्रम टाकू शकतात. तसेच यावर इतर गावातील उत्तम कामेही पाहता येतात, विषयानुसार संवाद साधता येतो, पाणी व स्वच्छता विषयक बातम्या व यशोगाथा मिळवता येतात, तसेच प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्रही प्राप्त करता येते. हा उपक्रम सरपंचांना प्रेरणा देणाऱ्या संवादाचे नवे व्यासपीठ असून ग्रामपातळीवरील सर्वांगीण, शाश्वत आणि लोकसहभागातून होणा-या विकासासाठी उपयुक्त ठरणारा आहे.
सरपंच संवाद ॲप्लिकेशन अॅन्ड्राईड मोबाईल वरून https://play.google.com/store/apps/details?id=com.qci.sarpanch_samvaad&pcampaignid=web_share व ऍपल मोबईल वापरकर्ता https://apps.apple.com/in/app/sarpanch-samvaad/id6452552802 या लिंकवरून डाउनलोड करता येते. सरपंच संवाद ॲप्लिकेशन जिल्ह्यातील सर्व सरपंचांपर्यंत पोहचविण्याबाबत तालुका स्तरावर सुचना देण्यात आली आहे. सर्व सरपंचांनी मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करुन, त्याचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी केले आहे.