महापालिकेतील लाचखोरी, ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांच्या नावासहित टक्केवारीची रक्कम जाहीर !!
schedule26 Jul 25 person by visibility 210 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भ्रष्टाचारात गुरफटलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या टक्केवारीचा भांडाफोड शु्क्रवारी झाला. कोल्हापूर महापालिकेत बिलाच्या मंजुरीसाठी कोणता अधिकारी किती रक्कमा घेतो याचे आकडेवारीच जाहीर झाली आहे. ड्रेनेज पाइपलाइनचे काम न करता ८५ लाख रुपये उचलल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, त्या ठेकेदार श्रीप्रसाद संजय वराळे यांनीची अधिकाऱ्यांच्या टक्केवारीचा टक्का जाहीर केला. यामुळे महापालिकेची यंत्रणा किती सडली आहे, आणि वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट कारभार करत आहेत याचा पुरावाच शहरवासियांसमोर आला आहे. एखाद्या ठेकेदाराकडूनच अधिकाऱ्यांना टक्केवारीच्या रुपात किती लाच दिली याचा पुरावा देण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांची लाचखोरी चव्हाटयावर आली.
ठेकेदार वराळे यांनी एका निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांच्या टक्केवारीची आणि संबंधितांना किती रक्कम पोहोच केली याची यादी महापालिका प्रशासक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्यासह मुख्यमंत्र्यांनाही मेल केली आहे. ठेकेदार वराळे यांनी कसबा बावडयात ड्रेनेजचे काम न करता ८५ लाख रुपये उचलले, महापालिकेची फसवणूक केली असा आरोप शिवसेनेचे जिल्हा समन्यवक व माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांनी केला होता. महापालिका प्रशासकाकडून या प्रकाराची चौकशी सुरू आहे. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. दुसरीकडे ठेकेदार वराळे यांनी शुक्रवारी, या कामाचे बिल मिळण्याकरिता अधिकाऱ्यांना रकमा पोहोच केल्याचे सांगत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली.
वराळे यांनी म्हटल्याप्रमाणे,‘ महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना एक टक्का या हिशेबानुसार साठ हजार रुपये, तत्कालिन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दोन टक्क्याप्रमाणे एक लाख वीस हजार, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना दोन टक्का या हिशेबाने एक लाख वीस हजार, उपशहर अभियंता रमेश कांबळे यांना साठ हजार, लेखापरीक्षक कलावती मिसाळ यांना तीस हजार रुपये दिल्याचे म्हटले आहे. ठेकेदार वराळे यांनी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा कांबळे यांना गुगल पे द्वारे ८० हजार रुपये दिल्याचा स्क्रीन शॉटही जोडला आहे. अकाऊंट विभागातील क्लार्क नाईक, अधिक्षक सुर्यवंशी यांना प्रत्येक लाखाला शंभर याप्रमाणे बिलावर सही करताना सहा हजार रुपये दिले. ऑडिट विभागातील क्लार्कला लाखाला शंभर रुपये, लेखापरीक्षक परीट यांना लाखाला २०० रुपये दिल्याचे म्हटले आहे.