जातीवंत म्हैस खरेदीसाठी गोकुळच्या अनुदानात वाढ ! सचिवांचे कमिशन वाढविले
schedule26 Jul 25 person by visibility 87 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळतर्फे जातीवंत म्हैस खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ केली आहे. एक जुलै २०२५ पासून ही वाढ लागू केली आहे. या अंतर्गत मुऱ्हा म्हैशीसाठी असणाऱ्या अनुदानाची रक्कम चाळीस हजार रुपयांवरुन ५० हजार रुपये तर मेहसाणा व जाफराबादी म्हैशीसाठी ३५ रुपयाऐवजी आता ४५ हजार रुपये अनुदान दूध उत्पादकांना मिळणार आहे अशी माहिती चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अजित नरके, प्रा. किसन चौगले, पशुसंवर्धन व्यवस्थापक प्रकाश साळोखे, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ. व्ही. डी. पाटील उपस्थित होते.
मुऱ्हा म्हैस खरेदी अनुदानातंर्गत दहा हजार रुपये वाहतूक भाडे, खरेदी केलेली म्हैस शेतकऱ्यांच्या गोठयात व्याल्यानंतर पंधरा हजार रुपये व उर्वरित २५ हजार रुपये तीन वर्षानंतर दिली जाते. मेहसाणा व जाफराबादी म्हैस खरेदी अनुदानातंर्गत वाहतूक खर्च दहा हजार रुपये, खरेदी केलेली म्हैस शेतकऱ्यांच्या गोठयात व्याल्यानंतर पंधरा हजार आणि तीन वर्षानी वीस हजार रुपये रोख दिले जातात. करवीर तालुक्यातील केर्ली येथील म्हैस खरेदी डेपोतून खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम तीस हजार रुपयावरुन चाळीस हजार रुपये केले आहे. यामध्ये पाच हजार वाहतूक भाडे, खरेदी केलेली म्हैस गोठयात व्याल्यानंतर १५ हजार तर उर्वरित वीस हजार रुपये तीन वर्षांनी मिळतात.
गायी-म्हैशींच्या दुधाच्या गुणवत्तेमध्ये, फॅट व एसएनएफमध्ये वाढ व्हावी यासाठी फर्टिमन प्लस मिनरल मिक्श्चर सवलतीच्या दरात दिले जाते. प्रत्येक दूध उत्पादकाने फर्टिमन प्लस वापरावे यासाठी १५० रुपयांचा पुडा ७५ रुपयेला उपलब्ध केला आहे. गोकुळने प्रत्येक दूध संस्थेतील सचिवांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महालक्ष्मी गोल्ड व कोहिनूर डायमंडच्या एक ते वीस पोत्यापर्यंत प्रति पोत्यासाठी दहा रुपये, २१ ते ४० पोत्यांपर्यंत चौदा रुपये, ४१ व त्यावरील पोतीसाठी प्रती पोत अठरा रुपये इतके कमिशन केले आहे.