शिवाजी विद्यापीठात बुधवारी वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभ
schedule30 Aug 26 person by visibility 48 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वि. स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभ स्मृती व्याख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी ( २ सप्टेंबर २०२६) सकाळी १०.३० वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित केले आहे.
समारंभाच्या उद्घाटन सत्रामध्ये ‘वि. स.खांडेकर: सुवर्ण स्मरण’ या विषयावर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर मांडणी करणार आहेत. या समारंभासाठी आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर, प्रा. सुनीलकुमार लवटे, डॉ. अतुल कापडी यांची प्रमुख उपस्थिती असेल. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.
दुसऱ्या सत्रामध्ये ‘वि. स. खांडेकरांच्या ग्रंथांवर चर्चा आणि ग्रंथ प्रकाशन’ होणार आहे. या सत्राचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे असतील प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मिलिंद जोशी (पुणे) उपस्थित असणार आहेत. या सत्रामध्ये प्रा. सुनिलकुमार लवटे यांनी संपादित केलेल्या ग्रंथांचे तसेच राम देशपांडे व नीलम माणगावे यांच्या ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात वि. स. खांडेकर सुवर्ण स्मृतीवर्ष विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येईल. यामध्ये साधना साप्ताहिक (पुणे), दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका (कोल्हापूर), जडणघडण (पुणे), मेहता ग्रंथ जगत या अंकांचे प्रकाशन होणार आहे. यामध्ये विनोद शिरसाठ, प्रा. चंद्रकांत पोतदार, सागर देशपांडे, अखिल मेहता, भाग्यश्री पाटील, अमेय मेहता सहभागी होत आहेत. पत्रकार विजय चोरमारे या सत्राचे अध्यक्ष असतील. तरी कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे.