अरुंधती महाडिक बनल्या लेखिका ! उलगडला नाईक -निंबाळकर घराण्याचा इतिहास, शाही पाककलांचा स्वाद !!
schedule04 Jul 26 person by visibility 452 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महिला सक्षमीकरणासाठी झटणाऱ्या, भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणाऱ्या अरुंधती धनंजय महाडिक या आता लेखिका म्हणून भेटीस येत आहेत. त्यांनी गेली दीड दोन वर्षे परिश्रम घेत फलटण वाठारच्या नाईक- निंबाळकर घराण्याचा इतिहास, परंपरा आणि शाही पाककलेचा स्वाद पुस्तक रुपातून उलगडला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून वाठारच्या नाईक - निंबाळकर घराण्यातील ऐतिहासिक कामगिरी आणि पाककलाना उजाळा मिळाला आहे.
पुस्तकाची निर्मिती उच्च दर्जाची केली आहे. यामध्ये नाईक- निंबाळकर घराण्यातील शाही पाककलेची सविस्तर माहिती , विविध शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ कसे बनवले जातात ? यासंबंधीची तपशीलवार साहित्य व कृतीसह मांडणी केले आहे. अरुंधती महाडिक यांचे वडील हैबतराव नाईक- निंबाळकर आणि आई विजयश्री नाईक - निंबाळकर यांच्यासह संपूर्ण नाईक- निंबाळकर परिवार, त्यावेळची जीवन पद्धती, वाठारमधील त्यांचे वाडे, नाईक निंबाळकर घराण्यातील कर्तृत्ववान पुरुष आणि अभिमानास्पद घटना, तत्कालीन मराठा साम्राज्यामध्ये निंबाळकर घराण्याचे आणि परिवाराचे योगदान हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे केवळ ऐतिहासिक दस्तावेज न राहता इतिहासकालीन सत्यतेची मांडणी करत वाचताना वेगळी अनुभूती देते. अरुंधती महाडिक यांच्या मातोश्री, त्यांच्या घराण्यातील काकी, आजी , बहिणी, भावजय आणि नव्या पिढीतील सुना नातवंडापर्यंतचा वंशवेल आणि नाईक निंबाळकर घराण्याची पिढ्यान पिढ्यांची पारंपारिक खाद्य संस्कृती या पुस्तकातून उलगडतेय फलटणवाटाच्या नाईक निंबाळकर घराण्यातील 16 व्या शतकापासूनच्या अनेक पिढ्यांनी पारंपारिक महाराष्ट्रीय जेवणाचा थाट आणि संस्कृती जपली आहे. काळाच्या ओघात अनेक पदार्थ लुप्त पावले. अशावेळी या पुस्तकामुळे चवीचा हा अनमोल ठेवा नव्या पिढीतील गृहिणींना समजणार आहे असे अरुंधती महाडिक यांनी सांगितले
पाककलेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जतन व्हावीत , नव्या पिढीला हे चविष्ट पदार्थ बनवण्याची माहिती मिळावी यासाठी हे रेसिपी बुक बनवण्याची सुरुवातीला भावना होती. त्या अनुषंगाने अरुंधती महाडिक यांनी माहेरच्या परिवारातील सर्व ज्येष्ठ महिलांशी संपर्क साधून पाठपुरावा केला. प्रत्येक पाककृतीची माहिती संकलित केली. आणि या सर्व शाही आणि तृप्त करणाऱ्या पदार्थांचे उत्तम छायाचित्राचे रेसिपी सांगणारे पुस्तक आकारास आले. या पुस्तकाद्वारे नाईक - निंबाळकर घराण्याची पाककौशल्य, परंपरा महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, स्वयंपाकातील बारकावे आणि त्याचवेळी नाईक निंबाळकर घराण्याचा संपूर्ण इतिहास एका जबाबदारीच्या भावनेतून पुस्तक रुपात आणला आहे असे त्या म्हणाल्या. या पुस्तकासाठी शिवशाहीर राजू राऊत यांनी इतिहास लेखन केले. इतिहास अभ्यासक डॉ. अमर आडके यांनीही मदत केली. कोल्हापुरातील सुचित्र ऍडव्हर्टायझिंगचे विशाल कुमठेकर यांनी या पुस्तकाची रचना, सजावट आणि छायाचित्रणाची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अक्षर दालनचे अमय जोशी यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या चित्रमय रेसिपी पाहिल्यानंतर दर्दी खवयाला आणि गृहिणीला पाककलेचा एक खजाना मिळाल्याचा आनंद होईल असे त्या म्हणाल्या. या पुस्तकासाठी खासदार धनंजय महाडिक यांची प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक मंगळवार पेठ कोळेकर तिकटी य येथील अक्षर दालन पुस्तक दुकानात तसेच छत्रपती ताराराणी चौका नजीकच्या भागीरथी महिला संस्थेच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहे.