बदलत्या मानसिकतेची नवी पहाट, उच्चशिक्षित इंजिनीअर मुलीने केले शेतकरी मुलासोबत लग्न !!
schedule05 Jul 26 person by visibility 400 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देवगड येथील उच्चशिक्षित, इंजिनीअर तरुणीने शेतकरी मुलांशी लग्न केले. सध्याच्या परिस्थितीत नोकरदार, पैसेवान कुटंबीयांशी सोयरीक जुळविण्याकडे कल असताना देवगडच्या या तरुणीचा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी या विवाह सोहळयाबद्दल पोस्ट लिहिताना, त्या मुलीचे कौतुक केले आहे. शेट्टी यांनी मांडलेल्या भावना त्यांच्याच शब्दात…
‘आजच्या काळात जिथे शेतीला 'तोट्याचा व्यवसाय' मानले जाते आणि शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे, तिथे देवगडच्या वैष्णवी कदम हिने घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. मे महिन्यात मी देवगड येथे आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या मेळाव्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस वैष्णवी व तिच्या वडीलांनी मला त्या मेळाव्यात भेटून लग्नपत्रिका दिली. लग्न पत्रिका देत असताना वैष्णवीने मोठ्या उत्साहात सांगितले कि साहेब मी इंजिनिअरिंग मधील उच्चशिक्षित मुलगी आहे. मात्र मी शेतकरी मुलाबरोबर लग्न करण्याचे ठरविले आहे. यामुळे माझ्या लग्नाला येवून तुम्हाला आशिर्वाद द्यावेच लागतील. त्यावेळेस तिचा तो आत्मविश्वास आणि तिने घेतलेला निर्णय ऐकुण क्षणभर मी स्थिरावलो.
आज आपल्या समाजासमोर एक भीषण वास्तव उभे आहे. "शेतकरी" जो जगाचा पोशिंदा आहे, त्याच्याच पदरी आज उपेक्षा आली आहे. शेतीतील अनिश्चितता आणि आर्थिक संकटामुळे आज अनेक मुली आणि त्यांचे कुटुंब शेतकरी मुलाला 'वर' (नवरदेव) म्हणून पसंत करत नाहीत. "मुलगा नोकरीवालाच हवा आणि तो पुण्या मुंबईसारख्या शहरात राहणारा असावा " या हट्टापायी गावागावात हजारो तरुण शेतकरी लग्नाविना बसले आहेत. ही परिस्थिती केवळ एका कुटुंबाची नसून संपूर्ण समाजासाठी एक मोठे सामाजिक संकट बनली आहे. पण याच अंधारात कोकणातील देवगड तालुक्यातील वैष्णवी कदम या उच्चशिक्षित मुलीने आशेचा एक नवा किरण दाखवला आहे.वैष्णवीने कोणत्याही कॉर्पोरेट झगमगाटाला किंवा शहरातल्या सुखसोयींना महत्त्व न देता, मनोज दळवी या एका कष्टाळू शेतकरी तरुणाला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवड केली.
वैष्णवीचा हा निर्णय केवळ एक लग्न नसून, तो समाजाच्या बुरसटलेल्या मानसिकतेवर ओढलेला एक प्रहार आहे.शिक्षण म्हणजे केवळ मोठी नोकरी मिळवणे नव्हे, तर योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखणे होय. वैष्णवीने आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग जोडीदाराचे 'कर्तृत्व' आणि 'माणुसकी' पारखण्यासाठी केला. मातीशी इमान राखणाऱ्या तरुणाला सन्मान मिळवून देऊन तिने सिद्ध केले की, शेतकरी हा कष्टाळू आणि प्रामाणिक असतो. जेव्हा उच्चशिक्षित मुली अशा प्रकारे पुढाकार घेतील, तेव्हाच शेतकऱ्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल.
वैष्णवीने समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे की, श्रीमंती ही केवळ पगाराच्या आकड्यांवर नसते, तर ती विचारांत आणि कष्टांत असते. जर आपण आपल्या पोशिंद्याचा आदर करू शकलो नाही, तर येणारा काळ आपल्यासाठी अधिक कठीण असेल. शक्तीपीठ महामार्गाच्या नियोजीत आंदोलनामुळे मला ८ जून रोजी झालेल्या वैष्णवीच्या लग्नाला जाता आले नाही. यामुळे काल सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वेळ काढून वैष्णवीच्या सासरी मांडे राणेगाव या गावी जावून तिला साडीचोळीचा आहेर करून वैवाहिक आयुष्यास शुभेच्छा दिल्या. वैष्णवी कदम आणि तिच्या या धाडसी निर्णयाचे मनापासून कौतुक! तुमच्या या निर्णयामुळे अनेक शेतकरी पुत्रांच्या मनात आशेची नवी पालवी फुटेल, यात शंका नाही.चला, आपणही आपली मानसिकता बदलूया... शेतकऱ्याला आणि शेतीला सन्मान देऊया!’