कोल्हापुरात बुधवारपासून मिलेटसह फळ महोत्सव
schedule20 Apr 26 person by visibility 63 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कृषी पणन मंडळामार्फत उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेंतर्गंत मिलेट व फळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २२ ते २६ एप्रिल 2026 या कालावधीत राजारामपुरी येथील भारत हाऊसिंग सोसायटी हॉल येथे पार पडणार आहे. महोत्सवाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी राहणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन बुधवार,२२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कोल्हापूर मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन,कृषी उत्पन्न मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे,विभागीय सहनिबंधक महेश कदम, विभागीय कृषी सह संचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा उप निबंधक नीलकंठ करे, जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगरे उपस्थित राहणार आहेत.
या महोत्सवात राज्यातील विविध भागांतील शेतकरी सहभागी होऊन मिलेट्स (तृणधान्ये) व त्यापासून तयार केलेले पदार्थ तसेच आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, अंजीर, पेरू आदी फळांची थेट विक्री करणार आहेत. ग्राहकांना शेतकऱ्यांकडून थेट खरेदीची संधी उपलब्ध होणार आहे. मिलेट्सचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व पटवून देण्यासाठी आहारतज्ज्ञ डॉ. संदीप पाटील, डॉ. अहिल्या वाघमोडे, डॉ. योगेश बन आणि डॉ. प्रतिभा थोंबरे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच शहरातील महिलांसाठी मिलेट्सच्या पाककृती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदी करावी आणि मिलेट व फळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केले.