गोकुळमध्ये महायुतीची सत्ता म्हणता, अहवालात जिल्ह्यातील एकाही भाजपच्या नेत्यांचा फोटो का नाही ?
schedule08 Sep 25 person by visibility 247 categoryउद्योग

काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत, स्टेजवर जाणार नाही, सभासदासोबतच सभेत थांबणार
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या गेल्या साडेतीन-चार वर्षातील कामकाजाबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांची अद्यापही समाधानकारक उत्तरे मिळाले नाहीत. त्यामुळे गोकुळच्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये आपण स्टेजवर जाणार नाही, तर दूध उत्पादकांच्या सोबतच सभेत थांबणार आहोत अशी स्पष्ट भूमिका गोकुळच्या संचालिका शौमका महाडिक यांनी मांडली. दरम्यान महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत, सभा शांततेत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी मंत्री मुश्रीफ यांना उद्देशून, गोकुळ मध्ये महायुतीची सत्ता आहे म्हणता, मग जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांचे फोटो गोकुळच्या अहवालामध्ये का नाहीत असा सवाल उपस्थित केला.
गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली होती. महायुतीचा अध्यक्ष असल्यामुळे सभा सुरळीत पार पाडावी असे आवाहन केले होते. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आम्ही शांततेने सहभागी होणार. कसल्याही प्रकारचा वाद-विवाद होणार नाही याची खबरदारी घेऊ. गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांचे आपणाला पूर्ण सहकार्य आहे. ते अजून नवीन आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी गोकुळच्या संचालक वाढीला विरोध कायम ठेवला गोकुळचे संचालक 21 वरून 25 करण्याचा विषय पत्रिकेवर विषय आहे. या विषयावर पुनर्विचार करावा. त्या विषयावर मंगळवारच्या सभेमध्ये कोणताही निर्णय घेऊ नये. संचालक वाढीला आपला पहिल्यापासून विरोध आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. गोकुळकडून खरेदी करण्यात आलेली जाजम खरेदीसंबंधी ही आपण प्रशासनाला पत्र दिले आहे. गोकुळचा कारभार हा काटकसरीने झाला पाहिजे. पूर्वी गोकुळच्या संचालकांच्या मीटिंगवर तीन लाखाची तरतूद केली जायची.त्यापैकी दोन लाख खर्च व्हायचे आता मात्र गेल्या चार वर्षात गोकुळच्या संचालकांच्या मीटिंगवरील खर्च 13 लाखापर्यंत पोहोचला आहे याशिवाय गोकुळच्या संचालकांचा अभ्यास दौरासाठी पूर्वी 30 लाख रुपयांची तरतूद केली जायची त्यापैकी 20 लाख रुपये खर्च व्हायचे आता मात्र गोकुळच्या संचालकांच्या अभ्यास दौऱ्याचा खर्च 56 लाखापर्यंत गेला आहे खर्च वाढणार असेल तर गोकुळच्या संचालक वाढीचा उपयोग काय ? संचालकांची संख्या वाढ केली तर आणखी खर्च वाढणार आहे. गोकुळ दूध संघा दूध उत्पादकांचा आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आपली प्रामाणिक भूमिका आहे. गेल्या साडेतीन-चार वर्षातील कामकाजाबद्दल मला जे प्रश्न होते ते सभासदांच्यावतीने मी वारंवार मांडले आहेत त्यासंबंधी अद्यापही समाधानकारक उत्तरे मिळालेले नाहीत म्हणून मी मंगळवारी होणाऱ्या गोकुळच्या सभेमध्ये स्टेजवर जाणार नाही. अध्यक्ष नवीन मुश्रीफ यांनी आपण सगळे महायुतीचे आहोत संचालक म्हणून तुम्ही स्टेज वरती या अशी विनंती केली आहे मात्र आपण कायम सभासदा सोबत राहणार आहोत सभासदांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये म्हणून मी सभासदांच्या सोबतच थांबणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आहे तेव्हा आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट करावं की ते सतेत आहेत की नाहीत, त्यानंतर मी योग्य ते उत्तर देईन. शिवाय विरोधकासारखे दोन्ही डगरीवर हात ठेवून राजकारण करायची आमची पद्धत नाही. आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडत असतो.
गोकुळमध्ये नेमकी सत्ता कोणाची ? अध्यक्ष महायुतीचा आहे की अन्य कोणाचा ? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर त्या म्हणाल्या की गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा आहे मात्र कारभारात आघाडी दिसते. चेअरमन मुश्रीफ यांच्याकडून आपणाला पूर्ण सहकार्य आहे. पूर्वी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नव्हती असेही त्यांनी सांगितले.
गोकुळ मध्ये महायुतीची सत्ता आहे म्हणता, मात्र गोकुळच्या वार्षिक अहवालामध्ये जिल्ह्यातील भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो नाही. मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक या प्रमुख नेतेमंडळींचाही अहवालामध्ये फोटो का नाही हा प्रश्न उपस्थित होत असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार अशोकराव माने, गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई विश्वास जाधव, दीपक पाटील, प्रताप पाटील कावणेकर, हंबीरराव पाटील हळदीकर, रविश पाटील आदी उपस्थित होते