मुंबईने एक लाख प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम उभारावे, सरकार सहकार्य करेल –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule16 May 25 person by visibility 233 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन : मुंबई क्रिकेट असोसिएशनला लवकरच शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक लाख प्रेक्षक क्षमतेचे क्रिकेट मैदान उभारावे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रस्ताव दिल्यास मैदानासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच सरकारी स्तरावर सर्व सहकार्य करण्यात येईल. आजच्या सोहळ्यामध्ये क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानावरील स्टॅन्ड्सला जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तींचे नाव देण्यात येत असल्याचा अभिमान असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित वानखेडे मैदान येथील स्टॅन्डच्या नामकरण सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. लॉर्डस नाही तर वानखेडे क्रिकेटची पंढरी असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या ठिकाणी देव असतो तीच खरी पंढरी. वानखेडे मैदानावर क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर यांचा पुतळा आहे. वानखेडे मैदान क्रिकेटसाठी आयकॉनिक आहे. या वानखेडे मैदानावर अनेक दिग्गज खेळाडू घडले आहेत. रोहित शर्मा हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. पाठोपाठ दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्याने भारतासाठी जिंकून इतिहास रचला आहे. एखादा खेळाडू खेळत असतानाच त्याचे नाव मैदनातील स्टॅन्डला देण्याचा हा ‘वानखेडे’च्या इतिहासतील पहिलाच क्षण असल्याचेही मुख्यमंत्री फणडवीस यांनी सांगितले.
‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष व खासदार शरद पवार म्हणाले की, वानखेडे उभारणीमध्ये तत्कालिन क्रीडा मंत्री म्हणून योगदान दिले. वानखेडे मैदानास मोठा इतिहास आहे.क्रिकेटमधील महान खेळाडूंच्या योगदानाचा सन्मान मुंबई असोसिएशनने नेहमीच केला आहे. रोहित शर्माचे नाव आज देशाच्या घराघरात पोहचले आहे. त्याच्या कर्तृत्वाची कायम आठवण रहावी यासाठी त्याचे नाव देण्याच्या निर्णया बद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अभिनंदन.’याप्रसंगी क्रिकेटपटू रोहित शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष संजय नाईक, सचिव अभय हडप, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री उपस्थित होते.
