तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंतच्या उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी
schedule11 Mar 26 person by visibility 332 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली. त्याला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सकारात्मक प्रतिसाद देवून, या प्रकल्पांबद्दल सविस्तर माहिती दिली. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. तावडे हॉटेल ते कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल होण्यासाठी गतीमान हालचाली व्हाव्यात, हा उड्डाण पुल पन्हाळा रोडवरील कोतोलीपर्यंत न्यावा, तर शहरातील उड्डाण पुलाची एक बाजू फुलेवाडीपर्यंत वाढवावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. त्याबद्दल केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी सविस्तर माहिती दिली. कोल्हापूर महापालिकेने युटिलिटी शिफ्टिंग आणि जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली, तर केंद्र सरकारकडून शहरातील उड्डाण पुलाचे काम करण्यासाठी पूर्ण सहकार्य असेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. शिरोली ते उचगाव दरम्यानच्या उड्डाण पुलासाठी ९१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर कागल शहराजवळ ३५८ कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाला मंजुरी दिल्याचे नामदार गडकरी यांनी स्पष्ट केले. खासदार महाडिक यांनी पिलरवरील उड्डाण पुल, बास्केट ब्रिज या बरोबर आता कोल्हापूर शहरातील उड्डाण पुलासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.