करवीर पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा ! सभापतिपदी राष्ट्रवादीचे साताप्पा पाटील, उपसभापतिपदी भाजपच्या दिपाली पाटील
schedule10 Mar 26 person by visibility 207 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर पंचायत समितीवर महायुतीने पहिल्यांदाच झेंडा फडकवला. सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताप्पा धोंडीराम पाटील तर उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या दिपाली संजय पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. मंगळवारी, दहा मार्च २०२६ रोजी पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. या सभेच्या अध्यक्षस्थानी करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार होते. गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके आणि यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत महायुतीने २४ पैकी सोळा जागा जिंकल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सात, भारतीय जनता पक्षाने सहा तर शिवसेनेने तीन जागांवर विजय मिळवला होता. नूतन सभापती साताप्पा पाटील हे परिते पंचायत समिती गणातून तर दिपाली संजय पाटील या पाचगाव पंचायत समिती गणातून विजयी झाल्या आहेत. करवीर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उपसभापतीपदी भाजपच्या दिपाली पाटील यांना संधी मिळाली आहे. दरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.