महिला - बालकल्याण समितीचा राखीव निधी वाढवा, दीपा ठाणेकरांची सहपालकमंत्र्यांच्याकडे मागणी
schedule03 Jun 26 person by visibility 63 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या निर्णयानुसार महापालिकांतील महिला व बालकल्याण समितीसाठी राखीव ठेवला जाणारा निधी हा, सरकारनेच सुचविलेल्या योजनांसाठी अत्यंत तोकडा आहे. खऱ्या अर्थाने महिला व बालकांचा विकास साधण्यासाठी या राखीव निधीमध्ये वाढ करण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी महापालिका महिला व बालकल्याण समिती उपसभापती दीपा ठाणेकर यांनी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे केली. यासंबंधीचे निवेदनही त्यांनी मंत्र्यांना दिले. याप्रसंगी कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील आणि माजी नगरसेवक अजित ठाणेकर उपस्थित होते. महापालिकांचे मुळातच कमी असलेले उत्पन्न आणि त्यातील बांधील खर्च वजा जाता राहिलेल्या निवळ महसुलातील ५ टक्के निधी हा महिला बालकल्याण समितीसाठी अत्यल्प होतो. उदाहरणार्थ सुमारे ५०० कोटी रुपये महसूली उत्पन्न असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये महिला बालकल्याण समितीसाठी केवळ साडेपाच कोटी इतकीच तरतूद होते आहे. ही बाब लक्षात घेता योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता एकूण महसूली उत्पन्नाच्या ५ टक्के इतका निधी महिला व बालकल्याण समितीसाठी राखीव ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही आपण करावी अशी विनंती ठाणेकर यांनी केली.