राहुल पाटलांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला हत्तीचं बळ, सतेज पाटलांनी मनाला लावून न घेता सहकार्य करावं
schedule01 Aug 25 person by visibility 130 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील यांचा गटाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. पीएन पाटील यांच्या गटाच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला हत्तीचं बळ प्राप्त होणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक नंबरचा पक्ष बनेल. दरम्यान राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादीचा प्रवेशाचा विषय काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मनाला फार लावून न घेता सहकार्य करावे. त्यांनी इतकं हळवं होण्याची आवश्यकता नाही. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे स्वप्नं राहुलच्या माध्यमातून पूर्ण करणे हीच त्यांना मनोभावे श्रद्धांजली ठरेल.’असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. सभासद नोंदणी व पदवीधर मतदार नोंदणीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत मुश्रीफ बोलत होते. माजी आमदार के. पी. पाटील, राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे चेअरमन नविद मुश्रींफ, संचालक प्रा. किसन चौगले, युवराज पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, कार्याध्यक्ष अनिल साळोखे, महिला आघाडीच्या शीतल फराकटे, बिद्रीचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राहुल पाटील व राजेश पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यासह घेतलेल्या भेटीचा वृत्तांत सांगत मुश्रीफ म्हणाले, ‘ लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोळा तारखेला कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ज्यावेळी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम असेल तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवित आपली ताकत त्यांच्या पाठीशी उभी करु या. पाटील यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला हत्तीचं बळ प्राप्त झालं आहे. पक्ष पुन्हा एकदा जिल्ह्यात नंबर एकचा बनेल. आतापर्यंत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी, माजी आमदारांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. राहुल पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेशाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी फार हळवं होऊ नये. मनाला लावून न घेता सहकार्य करावे.’ भाषणात मुश्रीफ यांनी आमदार पाटील यांचा आमचे मित्र असा उल्लेख केला.