आणू महादेवीला घरी ! दोन लाख चार हजार चारशे एकवीस कोल्हापुरकरांची स्वाक्षरी !
schedule02 Aug 25 person by visibility 42 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश यानिमित्ताने दिला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. शनिवारी, दोन ऑगस्ट रोजी सकाळी ही पत्रे घेऊन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नांदणी येथील मठात पोहोचले. याप्रसंगी दत्त साखर कारखानाचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक शेखर पाटील, नांदणी बँकेचे आप्पासाहेब लाटे, राहुल खानजिरे, शशिकांत खोत, विजय पाटील, विजय चौगले, सुदर्शन खोत, नितीन बागे उपस्थित होते. नांदणी मठ येथे महास्वामी यांच्या हस्ते स्वाक्षरी केलेल्या या सर्व फॉर्मचे पूजन झाले. दरम्यान दुपारी एक वाजता रमणमळा पोस्ट ऑफीस येथून हे सर्व फॉर्म राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांना पाठविण्यात येणार आहेत. आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रे राष्ट्रपतींच्याकडे पाठविली जातील.