Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

धुआँ जो कुछ घरों से उठ रहा है…न पूरे शहर पर छाए, तो कहना !

schedule02 Aug 25 person by visibility 278 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नांदणी येथील महोदवी हत्तीणला गुजरातला नेण्यावरुन समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना याविषयी आता अभिनेता किरण माने यांनीही परखडपणे व्यक्त केल्या आहेत. माने यांची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. धुआँ जो कुछ घरों से उठ रहा हैन पूरे शहर पर छाए, तो कहना ! असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

माने यांनी म्हटले आहे,‘एका मुक्या जीवाच्या भावनेशी लै जिवघेणा खेळ खेळला गेलाय. ‘वनतारा’ वाल्यांना एक प्रशिक्षित हत्ती हवा होता. संपूर्ण भारतात शोध घेतल्यावर त्यासाठी त्यांना दोन हत्तीणी पसंत पडल्या. त्यातली एक केरळची होती. केरळवाल्यांनी ती द्यायला साफ नकार दिला. मग हे ‘व्यापारी’ नांदणीत आले. तिथल्या महादेवी उर्फ माधुरीसाठी त्यांनी ‘सौदा’ करायचा प्रयत्न केला. “आम्हाला ही प्रशिक्षित हत्तीण हवी आहे” म्हणत पैशांचं आमिषही दाखवलं. पण अख्ख्या नांदणीचा जीव असलेली माधुरी ते कशी विकतील?
मग या स्टोरीत ‘ड्रामा’ आला. ‘पेटा’ नांवाच्या कॅरॅक्टरची एंट्री झाली. पेटाचे डॉक्टर्स अचानक माधुरीला तपासायला आले आणि त्यांनी सांगितलं की ‘माधुरीच्या पायाला इजा आहे. इथे तिच्या तब्येतीची हेळसांड केली जाते. तिचा जीव धोक्यात आहे.’ मग नांदणीवाल्यांनी त्यांचा डॉक्टर आणला. त्या डॉक्टरांनी सांगितलं माधुरी एकदम ठणठणीत आहे. पेटावाले सांगताहेत तसं काहीही नाहीये. पण पैशापुढं सरकारपासून न्यायव्यवस्थेपर्यंत सगळे झुकले.
महादेवी उर्फ माधुरीला नांदणी सोडून जावं लागलं. नांदणीवर तिचा आणि तिच्यावर नांदणीचा लै जीव होता. इथल्या प्रत्येक घरावर तिची मायेची सावली होती. माहेरी आलेली पोर पहिल्यांदा महादेवीला भेटायची, मग आईबापाला. गांव सोडताना या मुक्या प्राण्याची वेदना डोळ्यांतून घळाघळा वहात होती, ते पाहून काळीज पिळवटलं ! यापूर्वी अशाच पद्धतीनं दोन वर्षांपूर्वी ताडोबा अभयारण्यातनं तब्बल १३ हत्ती महाराष्ट्र सरकारनं रिलायन्सला दिलेले आहेत. कारणं तीच : हत्तींची काळजी घ्यायला कुशल स्टाफ नाही.’ तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या भावाबहिणींनो, आजवर गुजरात मध्ये एकही हत्ती नव्हता. पण येत्या काही काळात तुम्हाला हत्ती पाहायचा असेल तर गुजरातला जावं लागेल. कारण या लोकांचा देशातल्या अनेक हत्तींवर डोळा आहे आणि हाताशी ‘पेटा’ नावाचा हुकमी पत्ता आहे ! आता महादेवीनंतर तीन मठांच्या हत्तींवर संक्रांत आहे. कर्नाटकातल्या शेडबाळ, अकलनूर आणि बिचले इथल्या मठांना त्यांच्या हत्तींच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याची नोटिस गेली आहे. धुआँ जो कुछ घरों से उठ रहा हैन पूरे शहर पर छाए, तो कहना !

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes